

गणपती उत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सणासुदीच्या काळात होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेने २६१ गणपती विशेष गाड्या विविध ठिकाणांसाठी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांसाठी तिकिट बुक करताना अतिरिक्त शुल्क आकारणी केली जाणार आहे.
गणपती विशेष गाड्यांमध्ये मध्य रेल्वे २०१, पश्चिम रेल्वे ४२, कोकण रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) १८ गाड्या चालवणार आहे. या गाड्यांची सेवा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झाली असून त्या २० सप्टेंबरपर्यंत धावतील. तसेच, गर्दी कमी करण्यासाठी मुंबईहून येणाऱ्या विविध गाड्यांमध्ये स्लीपर क्लासचे डबे वाढवले जातील, असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.
जादा गाड्यांची वेळ आणि थांब्यांविषयीची सविस्तर माहिती www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी असेल, असेही रेल्वेने सांगितले.