

डॉ. योगेश प्र. जाधव
ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. ते पंतप्रधान झाले तर वेगळा इतिहास घडेल. आज भारतीय वंशाच्या अनेक प्रतिभावंत, कर्तृत्ववान व्यक्तींचा जगभरात डंका आहे. दहा देशांच्या राष्ट्राध्यक्षपदाची धुरा भारतीय वंशाच्या व्यक्ती समर्थपणाने सांभाळत आहेत. राजकीयच नव्हे, तर तंत्रज्ञान, उद्योग विश्वात अनेक भारतीय वंशाच्या व्यक्तींनी आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्याविषयी…
'सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा' असे म्हणत भारताने अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. इंग्रजांची जुलमी, अनन्वित अत्याचारांची वसाहतवादी राजवट उलथवून टाकून 75 वर्षांचा प्रवास करणार्या भारताने आज जागतिक पटलावर उभरती अर्थव्यवस्था म्हणून स्थान पटकावले आहे. दुसरीकडे भारतीय वंशाच्या अनेक प्रतिभावंत, कर्तृत्ववान व्यक्तींचा आज जगभरात डंका आहे. आशिया, आफ्रिका, अमेरिका अशा सर्वच खंडांमध्ये कॉर्पोरेट विश्वापासून ते राज्यसत्तेपर्यंत महत्त्वाच्या स्थानांवर विराजमान होणारे भारतीय वंशाचे नागरिक हे भारतभूमीचे वैभवबिंदू आहेत. ब्रिटनमध्ये बोरीस जॉन्सन यांच्यानंतर होणार्या पंतप्रधान पदाच्या निवडीमध्ये ज्या 'ऋषी सुनक' यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे, ते मूळचे भारतीय वंशाचे आहेत. त्यांचा विजय झाल्यास, ती भारतासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब असेल.
काळाचा महिमा मोठा विलक्षण असतो. कधीकाळी 'गारुड्यांचा देश' म्हणून ब्रिटनसह पाश्चिमात्य जगातील लोक भारताचा आणि भारतीयांचा नेहमीच उपमर्द करत होते. भारताला स्वातंत्र्य देतानाही, इथे लोकशाही कशी टिकणार? अशी शंका व्यक्त केली गेली होती; परंतु आज सात दशके अखंड लोकशाही व्यवस्था राबवून भारताने जगासमोर एक आदर्श घालून दिला आहे. भारताच्या बरोबरीने स्वातंत्र्य मिळालेल्या बहुतांश देशांत लष्करी हुकूमशाहीने सत्ता काबीज केल्या; पण भारतीयांनी लोकशाही अखंडपणाने पुढे नेली. येणार्या काळात याच भारताशी पाळेमुळे जोडलेली व्यक्ती ब्रिटनच्या सर्वोच्च स्थानी विराजमान होण्याच्या दिशेने प्रवास करत आहे. 'ऋषी सुनक' हे त्यांचे नाव. त्यांचे माता-पिता हे जरी 1960 च्या दशकात पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये स्थायिक झाले असले, तरी त्यांचे आजोबा पंजाब प्रांतात वास्तव्यास होते. 'ऋषी सुनक' हे इन्फोसिसचे संस्थापक अध्यक्ष असणार्या नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.
आजघडीला मॉरिशस, पोर्तुगाल, मलेशिया, सिंगापूर, सुरीनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगो, गुयाना, फिजी, आयर्लंड, सेशेल्स या दहा देशांच्या राष्ट्राध्यक्षपदाची धुरा भारतीय वंशाच्या व्यक्ती समर्थपणाने सांभाळत आहेत. पोर्तुगालमध्ये 'एंटोनियो कोस्टा' हे 26 नोव्हेंबर 2015 पासून पंतप्रधान पदावर आहेत. मॉरिशसमध्ये 23 जानेवारी 2017 पासून 'प्रविंद जगन्नाथ' हे पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत. 'हलीमा याकुब' या 2017 पासून सिंगापूरच्या राष्ट्रपती पदावर विराजमान आहेत. गुयाना या देशात 'इरफान अली' हे गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. सेशेल्समध्ये 'वेवेल रामकलावन', सुरीनाममध्ये 'चान संतोखी' राष्ट्रपती आहेत. भारतीय वंशाच्या अशा अनेकांनी विविध देशांमधील राजकारणात आपला ठसा उमटवला आहे.
इतिहासात डोकावल्यास 'दादाभाई नौरोजी' हे भारतीय वंशाचे पहिले खासदार होते, जे 1892 मध्ये निवडणूक जिंकून ब्रिटनच्या संसदेत पोहोचले होते. त्यांनी संसदेत केलेल्या भाषणात 'इंडियन मनी ड्रेन'चा मांडलेला विषय गाजला होता. इंग्रज भारतातून पैसा कसे घेऊन जातात, हे त्यांनी या भाषणात रोखठोकपणे मांडले होते. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भारतीयांच्या दारिद्य्राबद्दल आणि निरक्षरतेबद्दल ब्रिटिश शासनाला जबाबदार धरून त्यांनी कठोर प्रहार केला होता. ब्रिटिशांच्या राजवटीत जीवन कंठणार्या भारतीयांची सरासरी कमाई प्रतिवर्ष 20 रुपयेही नसल्याचे जळजळीत वास्तव त्यांनी मांडले होते. त्यामुळे आज जगभरातील राजकीय नेतृत्वांमध्ये भारतीयांची मांदियाळी दिसत असली, तरी ती तात्कालिक नसून तिला एक प्रदीर्घ परंपरा आहे, असे म्हणता येईल.
भारतीय वंशाची ही कर्तृत्ववान मंडळी विखुरलेली असल्यामुळे त्याची म्हणावी तशी नोंद आंतरराष्ट्रीय पटलावर घेतली गेली नाही, असे वाटते. अन्यथा, 2009 मध्ये आफ्रिकी वंशाचे बराक ओबामा जेव्हा जागतिक महासत्ता असणार्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले तेव्हा आणि त्यानंतरही जगभरातील प्रसार माध्यमांमधून या परिवर्तनाचे गोडवे अनेक वर्षे गायिले गेले. 'येस वी कॅन' असा नारा देणार्या ओबामांचा विजय हा निश्चितच मोठा होता; परंतु त्यामुळे भारतीय वंशाच्या व्यक्तींनी मिळवलेले यश दुय्यम ठरत नाही. इथे तुलना करण्याचा हेतू नसून, भारतीयांकडे पाहण्याचा प्रगत जगाचा द़ृष्टिकोन आजही पूर्णतः बदललेला नाही, हे यातून दिसून येते. भारतीय वंशाच्या केवळ तरुणांनीच नव्हे, तर महिलांनीही यशस्वी घोडदौड करत आपली छाप उमटवली आहे. दोन वर्षांपूर्वी न्यूझीलंडमध्ये घवघवीत यश मिळवून पंतप्रधान बनलेल्या जेसिंडा आर्डर्न यांनी 'प्रियंका राधाकृष्णन' यांना आपल्या कॅबिनेटमध्ये सहभागी करून घेतले.
न्यूझीलंडच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या भारतीय वंशाच्या महिलेला असा सन्मान मिळाला. 'प्रियंका' या 2017 मध्ये न्यूझीलंडच्या लेबर पार्टीकडून निवडणूक लढवून संसदेत पोहोचल्या होत्या. त्या मूळच्या केरळच्या असून, त्यांचा जन्म 1979 मध्ये चेन्नई येथे झाला. ऑकलंडमधील भारतीय वंशाच्या लोकांसाठी त्यांनी मोठे सामाजिक कार्य केले. त्रिनिनाद अँड टोबॅगोच्या पहिल्या महिला पंतप्रधान राहिलेल्या 'कमलाप्रसाद बिसेसर' या भारतीय वंशाच्या आहेत. 2010 ते 2015 या काळात त्यांनी पंतप्रधान म्हणून पदभार सांभाळला होता. जगभरातील शक्तिशाली राजकीय व्यक्तींमध्ये 'निक्की हेली' यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. रिपब्लिकन पक्षाच्या सदस्य असणार्या 'हेली' 2011 ते 2017 या काळात अमेरिकेतील साऊथ कॅरोलायना प्रांताच्या गव्हर्नर होत्या. हे पद मिळवणार्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'हेली' यांना संयुक्त राष्ट्रसंघामध्ये अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्त केले होते. 'हेली' यांचा जन्म पंजाबमधील शीख कुटुंबात झाला. त्यांचे वडील रणजितसिंह रंधावा अमृतसर जिल्ह्यात वास्तव्यास होते.
अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात प्रचारात दिसणार्या 'कमला हॅरीस' या आज अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष आहेत. त्याही भारतीय वंशाच्या महिला आहेत. मागील काळात आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून 'लियो वराडकर' यांची जगभरात चर्चा झाली. त्यांचे वडील अशोक हे मुंबईतून तिकडे स्थायिक झालेले डॉक्टर होते. गतवर्षी कॅनडामध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारतीय वंशाच्या 17 नेत्यांचा विजय झाला. यामध्ये न्यू डेमोक्रॅटिक पक्षाचे नेता 'जगमित सिंह' आणि 'हरजित सिंह सज्जन' यांचा समावेश आहे. दक्षिण प्रशांत महासागराच्या क्षेत्रात वसलेल्या फिजी या देशामध्येही खासदार, मंत्री आणि पंतप्रधानपदीही भारतीय वंशाच्या व्यक्तींनी आपली मोहोर उमटवली आहे. या देशाची 38 टक्के लोकसंख्या (पान 4 वर)(पान 1 वरून) भारतीय वंशाची आहे. लेबर पार्टीचे नेते 'महेंद्र चौधरी' हे 1999 मध्ये या देशाचे पंतप्रधान होते. कॅनडा या देशाच्या कॅबिनेटमध्येही भारतीय वंशाच्या लोकांची संख्या मोठी आहे. 'अनिता इंदिरा आनंद' या कॅनडाच्या मंत्रीमंडळात सहभागी झालेल्या पहिल्या हिंदू महिला आहेत. 2010 मध्ये कंझर्व्हेटिव्ह पक्षाकडून निवडणूक लढवून ब्रिटनच्या संसदेत पोहोचलेल्या 'प्रीती पटेल' या पुढे जाऊन गृहमंत्री बनल्या. त्यांच्या रूपाने पहिल्यांदा भारतीय वंशाची महिला ब्रिटनची गृहमंत्री बनली.
'प्रीती' या गुजराती समाजाच्या असून, त्यांचे आई-वडील आफ्रिकेतून युगांडामध्ये वास्तव्यास गेले. या यादीमध्ये 'बॉबी जिंदाल' यांच्या नावाचा उल्लेख अग्रक्रमाने करावा लागेल. कारण अमेरिकेत लुईजियाना प्रांताचे गव्हर्नर बनलेले 'बॉबी जिंदाल' हे राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतही होते. 'रिचर्ड राहुल वर्मा' हे 2014 मध्ये भारतात अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्त झाले. भारत-अमेरिका नागरी अणुकरारादरम्यान त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.
राजकीय क्षेत्रातच नव्हे, तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, उद्योग विश्वातही भारतीय वंशाच्या व्यक्तींनी आपला ठसा उमटवला आहे. दोन वर्षांपूर्वी बाटा या स्विस कंपनीने 126 वर्षांत पहिल्यांदाच 'संदीप कटारिया' या भारतीय व्यक्तीची जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती केली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून 'गीता गोपीनाथ' या सर्वांनाच माहीत आहेत. गुगलचे सीईओ 'सुंदर पिचाई', मायक्रोसॉफ्टचे सीईओ 'सत्या नडेला', पेप्सिकोच्या सीईओ 'इंद्रा नुई', एडोब सिस्टम्सचे सीईओ 'शंतनू नारायण' अशी अनेक नावे यामध्ये समाविष्ट करता येतील. आजघडीला मूळ भारतीय वंशाचे 128 शास्त्रज्ञ जगभरात भारताचे नाव उज्ज्वल करीत आहेत.
भारतीय वंशाच्या या यशवंतांची आणि यशस्विनींची यादी पाहून अभिमानाने ऊर भरून येणे स्वाभाविक आहे. तथापि, दुसर्या बाजूनेही याचा विचार व्हायला हवा. ती बाजू म्हणजे प्रतिभावंतांची, बुद्धिवंतांची खाण असणार्या आपल्या भारतभूमीतून ही ज्ञानसंपत्ती परदेशस्थ का झाली? आपण अमेरिकेसारख्या देशांमध्ये संशोधनात मोठ्या प्रमाणावर बौद्धिक योगदान देतो. हा 'ब्रेन ड्रेन' रोखून या बुद्धिमत्तेचा उपयोग भारताच्या प्रगतीसाठी झाला पाहिजे. त्याचबरोबर जगभरात इतक्या मोठ्या पदांवर, सत्तास्थानांवर असणार्या भारतीय वंशाच्या लोकांना एकत्र आणून, त्यासाठी एक व्यासपीठ तयार करून सक्षम अशी लॉबी तयार करण्यासाठीही जोमाने प्रयत्न होणे गरजेचे आहे. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशादेशांमधील भारतीयांच्या लॉबीला मायदेशासाठी योगदान देण्याचे, गुंतवणूक करण्याचे आवाहन करत आहेत. त्याला सकारात्मक प्रतिसादही मिळत आहे; परंतु त्याच वेळी भारतीय वंशाच्या जगभरातील आजी-माजी राजकीय नेत्यांना, सीईओंना एकत्र आणून त्यांचे एखादे संमेलन आयोजित केले गेले पाहिजे. त्यांच्या एकत्रित मार्गदर्शनातून, योगदानातून नव्या आधुनिक भारतासाठी नवी दिशा मिळू शकेल. त्याचबरोबर जागतिक सत्ताकारणात भारतीयत्वाला नवी बळकटी मिळू शकेल.
आजघडीला अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांची संख्या सध्या 30 लाख आहे. अमेरिकेत जगभरातील विविध देशांमधून आलेल्या लोकांच्या मोठ्या समुदायांमध्ये भारतीयांचा समुदाय हा तिसरा सर्वात मोठा समुदाय आहे. अमेरिकेतील हा सर्वात जास्त श्रीमंत वांशिक समुदाय असून, त्यांचे दरडोई उत्पन्न 88 हजार डॉलर इतके आहे. अमेरिकेतील 40 टक्के हॉटेल्स गुजराती लोकांच्या मालकीचे आहेत. या 30 लाखांपैकी 17 लाख लोकांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळालेले आहे. अमेरिकेच्या राजकारणामध्ये आणि परराष्ट्र धोरणामध्ये 'लॉबी सिस्टीम'ला प्रचंड महत्त्व आहे. जे लोक संघटित रूपाने एकत्रित येतात आणि त्यांच्या दबावतंत्राचा वापर करतात, त्यांना विशेष महत्त्व आहे. गेल्या काही वर्षांत भारतीयांच्या लॉबीचाही तेथील प्रभाव वाढत आहे. भारत-अमेरिका नागरी अणुकरार, कारगिल युद्ध यांमध्ये हा प्रभाव ठळकपणाने दिसून आला होता.