‘भारत जोडो’चा अन्वयार्थ

‘भारत जोडो’चा अन्वयार्थ
Published on
Updated on

नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान खोल रहा हूँ,' असे म्हणत राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत काढलेल्या 'भारत जोडो' यात्रेला मिळालेला प्रतिसाद चांगला होता. यात्रेच्या समारोपप्रसंगी श्रीनगरमध्ये झालेल्या बर्फवृष्टीने यात्रेचा परमोच्च बिंदू गाठला. 2014 साली देशाच्या राजकारणातून उखडलेल्या काँग्रेसचे पुनरुज्जीवन करण्यासाठी याचा किती उपयोग होतो, हे आजतरी सांगता येणार नसले तरी त्यावरच यात्रेचे मूल्यमापन करणे इष्ट ठरेल. राहुल यांची समाजमाध्यमांमधून बनवली गेलेली प्रतिमा बदलण्यासाठी यात्रा महत्त्वाची ठरली असून, एक 'नवे राहुल गांधी' यानिमित्ताने देशासमोर आले. अर्थात, त्याचमुळे त्यांच्याकडून भूतकाळापेक्षा अधिक जबाबदार राजकारणाची अपेक्षा आहे. कारण, लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष मजबूत असल्याशिवाय लोकशाहीचा गाडा नीट चालत नाही. त्यातही पुन्हा राष्ट्रीय पक्ष मजबूत असणे गरजेचे असते.

देशातील अनेक राज्यांमध्ये वायएसआर काँग्रेसपासून तृणमूल काँग्रेसपर्यंत अनेक प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत; परंतु प्रादेशिक पक्षांची ही बळकटी त्यांच्या राज्यातील राजकारणाच्या हितापुरती मर्यादित राहते. व्यापक राष्ट्रहिताचे संवेदनशील मुद्दे येतात तेव्हाही प्रादेशिक पक्ष व्यक्तिगत हितसंबंधाच्या राजकारणाचा विचार करूनच भूमिका घेतात आणि अनेकदा ती देशहिताच्या विरोधातील असते. अशावेळी राष्ट्रीय पक्षाची निकड तीव—तेने जाणवते. त्या दृष्टिकोनातून हे पहिले पाऊल म्हणावे लागेल. सात सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारीपासून यात्रा सुरू झाली, तेव्हा तिची व्याप्ती किती असेल, प्रतिसाद कसा आणि विशेष म्हणजे राहुल गांधी एवढ्या सलगपणे यात्रेत सहभागी होतील का, असे अनेक प्रश्न देशातील जनतेच्या मनात होते; परंतु अगदी सुरुवातीपासूनच यात्रेला प्रतिसाद मिळत गेला आणि देशभरात त्यामुळे एक वातावरणनिर्मिती झाली. यात्रा राजकीय नसल्याचे ते वारंवार सांगत असले तरी राजकारणाच्यादृष्टीने तिचे महत्त्व होतेच. 135 दिवस चाललेली यात्रा चौदा राज्ये आणि 75 जिल्ह्यांतून गेली. तीन हजार 570 किलोमीटरची पदयात्रा यानिमित्ताने झाली.

राहुल यांनी विविध समाजघटकांतील लोकांशी संवाद साधला. व्यापारी, शेतकरी, मजूर, तरुण-तरुणी, नोकरदार, वकील, डॉक्टर्स, इंजिनिअर्स अशा अनेक वर्गांतील लोक त्यांना भेटले आणि त्यांनी प्रश्न समजून घेतले. विविध प्रांतांतील कलावंतांनीही यात्रेत सहभाग नोंदवला. सभा, पत्रकार परिषदांच्या निमित्ताने त्यांनी सातत्याने संवाद साधला आणि माध्यमांच्या प्रश्नांचीही उत्तरे दिली. राहुल देशाला कसे दिसले हे जसे महत्त्वाचे होते, तसेच देश आणि देशातील सर्व वर्गांतील माणसाला ते कसे दिसले, जनमानसाचा संपर्क तुटलेल्या आणि मोठ्या अपेक्षा असलेल्या या पक्षनेत्याचे भान किती जागवले गेले, हेही महत्त्वाचे होते.

2014 साली नरेंद्र मोदी यांच्या लाटेमध्ये काँग्रेस पक्षाला जबर तडाखा बसला, त्यामुळे सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळण्याएवढ्या जागाही काँग्रेसला मिळाल्या नाहीत. देशाची सत्ता दीर्घकाळ उपभोगलेल्या पक्षाची ही अवस्था चिंताजनक म्हणावी अशीच होती. काँग्रेसच्या या अवस्थेला अर्थात या पक्षाचे नेतृत्वच जबाबदार होते. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासारखे विरोधक समोर असताना काँग्रेस नेतृत्वाने त्यांच्याशी लढण्याची इच्छाशक्तीच दाखवली नाही. मोदी-शहा केंद्रातील सत्तेची ताकद असतानाही राजकारणावरील पकड त्यांनी कधी ढिली होऊ दिली नाही; उलट ती अधिक प्रभावी आणि व्यापक कशी होईल यासाठी प्रयत्न केले. असे असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी मात्र 'पार्ट टाइम' राजकारण करीत असल्यासारखे वाटत होते.

सत्ताधारी भाजपविरोधात काँग्रेससह विरोधक निष्प्रभ झाल्याचे चित्र दिसत असताना राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढून देशाचे लक्ष वेधून घेतले. दरम्यानच्या काळात गुजरात, हिमाचलच्या विधानसभा निवडणुका झाल्या. भारत जोडो यात्रा त्या राज्यांतून गेली नाही, त्यामुळे राजकीय निरीक्षकांनी टीकाही केली; परंतु राहुल गांधी यांचे उद्दिष्ट स्पष्ट होते आणि त्यापासून ते कुठल्याही टप्प्यावर विचलित झाले नाहीत. समविचारी पक्ष आणि संघटनांनाही यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच यात्रेमध्ये काँग्रेसच्या झेंड्याऐवजी तिरंगा झेंडा वापरून यात्रा पक्षनिरपेक्ष करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. पक्ष म्हणून देशात एकीचे वातावरण निर्माण करणे, तसेच धर्म, भाषा, जातीच्या आधारावर फूट पाडण्याचे प्रयत्न रोखणे, असा या यात्रेचा उद्देश असल्याचे काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात येत होते. त्यांच्या या टीकेचा रोख साहजिकच भारतीय जनता पक्षाच्या ध—ुवीकरणाच्या राजकारणावर होता. काँग्रेसचा थेट सामना भारतीय जनता पक्षाविरोधात आहे, त्यामुळे भाजपवर टीका केली जाणे स्वाभाविकही होते. कोणताही राजकीय पक्ष किंवा नेता संभ—मात असतो, तेव्हा त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरे लोकांमध्ये गेल्याशिवाय मिळत नाहीत. भूतकाळात महात्मा गांधी यांच्यापासून चंद्रशेखर, राजशेखर रेड्डी यांच्यासारख्या नेत्यांनी लोकांमध्ये जाऊन वादळ निर्माण केल्याची उदाहरणे पाहावयास मिळतात. राहुल गांधी यांनी तोच मार्ग निवडला.

गलितगात्र काँग्रेसला ऊर्जितावस्था आणण्यासाठी भारत जोडो यात्रेचा उपयोग झालेला दिसून येतो; परंतु केवळ यात्रा काढून जबाबदारी संपणार नाही. त्यानंतरही सातत्याने लोकांमध्ये राहून राजकारण करावे लागेल. लोकांच्या प्रश्नांची लढाई सोशल मीडियाच्या माध्यमांतून नव्हे, तर लोकांमध्ये मिसळून करावी लागेल. सातत्याने नकारात्मक राजकारण करण्याऐवजी विधायक आणि रचनात्मक राजकारणालाही प्राधान्य द्यावे लागेल. लोकशाहीच्या भवितव्यासाठी राजकीय पक्षांनी लोकांमध्ये मिसळून काम करण्याची आवश्यकता आहे. महागाई, बेरोजगारीसारख्या अनेक प्रश्नांनी त्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी लोकांमध्ये मिसळण्याची आवश्यकता आहे. यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी नव्याने सुरुवात केली आहे, त्यांचे हेच सातत्य भविष्यातही दिसायला हवे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news