Independence Day special बिंदू चौक : बिंदू चौकात या… असं कोल्हापुरी माणूस कधीपासून म्हणतोय?
बिंदू चौकात या! समोरासमोर चर्चा करु असं खुलं आव्हान हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांना काही दिवसांपूर्वीच दिलं. त्यांनी हे आव्हान ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून दिलं होतं. हा बिंदू चौक म्हणजे कोल्हापुरातीलच नाही तर अनेक बड्या राजकारण्यांचं हक्काचं व्यासपीठ आहे. तेथूनच प्रतिस्पर्ध्यांना आव्हानं प्रतिआव्हानं दिली जातात. या बिंदू चौकात अनेक ऐतिहासिक सभा झाल्या आहेत.
तेथूनच अनेकांनी आपल्या प्रचार सभांचा नारळ फोडला आहे. अनेक सामजिक कार्यकर्ते आपल्या आंदोलनाची सुरुवात बिंदू चौकातूनच करतात. आपण असं मानतो की बिंदू चौक हा कोल्हापूरचा मध्यभाग आहे. बिंदू चौक म्हणजे हार्ट ऑफ द सिटी! पण, इतिहासात डोकावले तर हा बिंदू चौक कोल्हापूरचा मध्यभाग नव्हता किंबहुणा बिंदू चौक पूर्वी बिंदू चौक म्हणून ओळखलाच जात नव्हता. ती होती रविवार वेस! वेस म्हणजे शहराची तटबंदी…
मग, बिंदू चौक अस्तित्वात कसा आला? त्याला बिंदू चौकच का म्हणतात? तर या बिंदू चौकाला एक ऐतिहासिक संदर्भ आहे. त्याचा संबंध स्वतंत्र्य चळवळीशी आहे.
बिंदू चौकाचा 'भारत छोडो'शी संबंध
महात्मा गांधींनी यांनी १९४२ ला भारत छोडो आंदोलन सुरु केले होते. भारत छोडो आंदोलनाचे लोन कोल्हापुरातही पोहचले होते. कोल्हापुरात पूर्वीपासूनच काही छुप्या आणि काही उघड उघड क्रांतीकारी कारवाया सुरु होत्या. त्यामुळे महात्मा गांधींच्या भारत छोडो आंदोलनालाही कोल्पापुरात भरभरुन प्रतिसाद मिळत होता.
कोल्हापुरात नागपंचमीच्या दिवशी १५ ऑगस्ट १९४२ रोजी वरिष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी खासबाग मैदान येथे सभा आयोजित केली होती. या सभेला मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी जमले होते. दरम्यान, ही सभा उधळून लावण्याच्या उद्येशाने इंग्रज सरकारने पोलिसांची घोडदळाची एक तकुडी तैनात केली होती.
पोलिसांनी ही सभा उधळून लावण्यासाठी बळाचा वापर करण्यास सुरुवात केली. पण, कोल्हापुरात इंग्रज सरकार विरुद्धचा रोष टिपेला पोहचला होता. तेथे जमलेल्या लोकांनी विरोध करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सभा आयोजित केलेला भाग रिकामा करण्यासाठी बळजबरी सुरु केली. दरम्यान तणाव वाढला.
घोड्यावरच्या पोलिसांची मारहाण सुरु
घोड्यावर बसलेल्या पोलिसांनी लोकांना मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनीही दगडफेक सुरु केली. त्यानंतर सगळीकडे पाळापळ सुरु झाली. घोड्यावरील पोलीस लोकांना पकडू लागल्याने लोकही सैरभैर होत धावू लागले. दरम्यान, बागवान रस्त्याच्या जवळ एका शाळकरी मुलाच्या डोक्यावर एका पोलिसाने आपल्या हातातील दांडक्याने जोरदार हल्ला केला.
हा विद्यार्थी अब्बास बागवान यांच्या घराजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा आधीच मृत्यू झाला होता. दरम्यान, त्याची अंत्ययात्रा दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ ऑगस्ट रोजी शहरातील सर्व रस्त्यांवरून काढण्यात आली. ही अंत्ययात्रा रविवार वेशीजवळ आली आणि काही जणांनी रविवार वेशीच्या तटबंदीवर बिंदू नारायण चौक असा फलक लावला. तेव्हापासून रविवार वेस ही बिंदू चौक म्हणून ओळखली जाऊ लागली.
बिंदू चौकात करवीर वासियांनी केले पुतळ्यांचे अनावरण
पण, आजपर्यंत कोणीही बिंदू नारायण कुलकर्णी याचा फोटो पाहिलेला नाही. या घटनेनंतर बिंदू चौक सार्वजनिक सभांसाठी वापरण्यात येऊ लागला. ९ डिसेंबर १९५० मध्ये डॉ. बाबासाहेब अंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांचा पुतळा चौकात बसवण्यात आला. या पुतळ्याचे अनावरण करवीरमधील लोकांच्या हस्ते झाले होते. या पुतळा अनावरण समितीचे चेअरमन स्वतंत्र्य सेनानी भाई माधवराव बागल होते.
त्यानंतर १७ ऑक्टोबर १९६० रोजी तेथे हुतात्मा स्तंभ उभारण्यात आला. या स्तंभाचे अनावरण तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केले होते. त्यावेळी पी. पवार हे कोल्हापूरचे महापैर होते.
पाहा व्हिडिओ : जेव्हा कोल्हापूरकर चित्त पाळून शिकार करायचे!

