

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा महानगरपालिका आगामी निवडणुकीसाठी नव्याने प्रारूप मतदार यादी तयार केली जाणार आहे. सोमवार (दि. 6) पासून प्रारूप मतदार यादीसोबत शहरातील ओबीसींची माहिती संकलनाचेही काम सुरू केले आहे. यासाठी नुकतेच 478 बीएलओंना प्रशिक्षण दिले आहे. उपायुक्त रविकांत आडसूळ यांच्या उपस्थितीत हे प्रशिक्षण घेतले आहे.
गतसभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर 2020 रोजी संपली आहे. तेव्हापासून महापालिकेत प्रशासक कारकीर्द सुरू आहे. गेल्या काही महिन्यांत निवडणुकीची धामधूम सुरू झाली. अंतिम प्रभाग रचना जाहीर केली. महापालिकेचे 31 प्रभाग तयार केले असून 92 जागा निश्चित केल्या आहेत. तर मंगळवारी (दि. 31) नव्याने आरक्षण सोडत काढली आहे.ओबीसी आरक्षणाबाबत अद्याप निर्णय झाला नाही.
आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी 1 जानेवारी 2022 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. दि. 17 जून 2022 रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. यावर हरकती आणि सुनावणी होऊन दि. 7 जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी पुरमहापालिका निवडणुकीसाठीचा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला. यानुसार शुक्रवारपासूनच मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. मतदार यादीसोबतच ओबीसी माहिती संकलनाचेकामही बीएलओमार्फत सुरू करण्यात आले आहे. बीएलओमार्फत घर टू घर सर्वेक्षण करुन संबंधित मतदार ओबीसी आहे का याची होय किंवा नाही या स्वरूपात मतदार यादीत नोंद घेतली जाणार आहे. माहिती संकलनाचे काम सुरू झाले आहे. माहिती संकलनानंतर सर्व माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केली जाणार आहे. या निमित्ताने शहरातील ओबीसींची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.