

बीजिंग : चोरट्यांचा, बॉम्ब अथवा अंमली पदार्थांचा शोध घेण्यासाठी बहुतेकवेळा पोलिस दलाकडून श्वान पथकांचा वापर केला जातो. त्यांना स्निफर डॉग म्हणून ओळखले जाते. या श्वानांचा चतुरपणा आणि वास ओळखण्याची ताकद अत्यंत चांगली असते. यामुळेच ते गुन्हेगारांचा अचूक शोध लावत असतात.
पण, आता स्निफर डॉग म्हणून ओळखण्यात येणारा श्वानांची नोकरी धोक्यात आली आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. कारण, चीनमध्ये श्वानांऐवजी पोेलिस आता चक्क खारींचा वापर करू लागले आहेत. या देशात आता गुन्ह्यांचा तपास लावण्यासाठी खारींचे पथक स्थापन करण्यात आले आहे . ऑडिटी सेंट्रल न्यूज नामक संकेतस्थळावरील माहितीनुसार चीनमधील चाँगकिंग या शहरात अंमली पदार्थ तष्करीच्या समस्येशी दोन हात करण्यासाठी पोलिस दल आता खारींना ट्रेनिंग देऊन तयार करत आहे. चाँगकिंगमधील हेचुआन जिल्ह्यातील क्रिमिनल पोलिस विभागाकडून खारींच्या पथकाला ट्रेनिंग देण्यात येत आहे. या पथकाला तेथे स्निफिंग स्क्वायलर असे नाव देण्यात आले आहे.
चीनमध्ये गेल्या काही वर्षार्ंपासून रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट मोहीम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून अँटी ड्रग अॅनिमल्स तयार करण्यात येत आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, खारींचे सुंघण्याची शक्ती फारच प्रबळ असते. यामुळेच अंमली पदार्थांचा शोध लावण्यासाठी खारींचा आता चीनमध्ये वापर करण्यात येणार आहे.