

श्रीराम ग. पचिंद्रे
स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका आदिवासी महिलेला राष्ट्रपतिपद प्राप्त झालेले आहे. महामहिम द्रौपदी मुर्मू या आज राष्ट्रपतिपदावर विराजमान आहेत. हा भारतीय आदिवासी समाजाचा क्रांतिदिनच मानावा लागेल. आदिवासी समाज हा पृथ्वीतलावरचा आदिम रहिवासी आहे. सर्वप्रकारच्या नागरी सुविधांपासून आणि नागरी संस्कारांपासून वंचित, जंगलातील गाभ्यात वाडी करून राहणारा हा समाज आहे. आर्य आणि द्रविड यांच्याही पूर्वीचा हा समाज आहे. त्यांना एक प्राचीन इतिहास आहे. त्यांची संस्कृती भिन्न आहे, रीतिरिवाज भिन्न आहेत. त्यांच्या देवदेवता भिन्न आहेत. 'जैत रे जैत', 'मृगया' यांसारख्या कादंबर्यांतून, चित्रपटांतून त्यांचे ओझरते दर्शन नागरी समाजाला होत असते; पण बर्याचदा कथा-कादंबरीतून आदिवासी लोकांचे चित्रण नकारात्मक झालेले दिसून येते. समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊनही ते असंस्कृत आणि अडाणी राहिल्याचे चित्रण अधिक झालेले आहे.
अब्जावधी वर्षे अरण्यातच राहिलेला हा समाज आता आता कुठे मुख्य राष्ट्रीय प्रवाहात येऊ पाहतो आहे, शिकतो आहे, नोकरी मिळवत आहे, क्रीडा क्षेत्रात पुढे जाऊ पाहत आहे. तो एकाएकी नागरी जीवनाशी समरस होईल तरी कसा? आज जागतिक आदिवासी दिन आहे. कारण, आदिवासी समाज जगाच्या सर्व भागांत आहे; पण सध्या आपण महाराष्ट्रापुरता विचार करू या. सातपुडा पर्वतराजीत भिल्ल, गामीट, कोरकू, धनका, पारधी, नायकडा, राठवा या आदिवासी जमाती आहेत. गोंड, आंध, कोलाम, परधान, हलबा-हलबी, कावर, थोटी-थोट्या या गोंडवन गटातील आदिवासी जमाती आहेत. याशिवाय इतरही काही जमातींचा आदिवासी म्हणून समावेश होऊन अनुसूचित जमातीच्या यादीत आज सत्तेचाळीस जमाती आढळतात. सगळ्या आदिवासी समाजातील चालीरीतींमध्ये बरेच वैविध्य आढळते. विवाहाचे अनेक प्रकार त्यांच्यात आहेत. वधूला पळवून नेऊन तिच्याशी लग्न लावणे हा राक्षसविवाह, वधूपित्याच्या घरी काही काळ सेवा करून तिच्याशी केला जातो तो सेवा विवाह, वधूच्या बापाला पैसे देऊन विवाह करणे हा क्रय विवाह, एकमेकांच्या नात्यात मुली देऊन केलेला साटेलोटे विवाह असे विवाहाचे प्रकार थोड्याफार प्रमाणात नागरी संस्कृतीतही होतात.
बहुतेक सगळ्या आदिवासी जमातींमध्ये नृत्याची आवड असते. ते सामुदायिक नृत्य खूप सुंदर करतात. त्यांच्या नृत्यांची नक्कल बर्याच हिंदी चित्रपटांमध्ये केलेली आढळते. आदिवासींची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 9 ते 9.20 टक्के एवढी होती; पण गेल्या वीस वर्षात ही संख्या नऊ टक्क्यांपेक्षा कमी झालेली आढळते. राज्यातील धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, ठाण्याचा पर्वतीय प्रदेश, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती, गोंडवन (यवतमाळ) हा जंगलव्याप्त प्रदेश आदिवासींचा रहिवास आहे. भिल्ल, गोंड, पावरा, महादेव कोळी, वारली, ठाकूर कोला कातकरी, माडिया गोंड या आदिवासींच्या जमाती आहेत. त्यापैकी कोलाम, कातकरी आणि माडिया गोंड या तीन आदिम जमाती म्हणून केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या आहेत. कोकण भाग आणि गोव्याच्या अरण्यमय भागातही आदिवासींचे वास्तव्य आहे. आज आदिवासींना शैक्षणिक सुविधा देण्यासाठी शासनाने 29 प्रकल्प सुरू केलेले आहेत. त्यामधून आदिवासी आता शिक्षण घ्यायला लागले आहेत. त्यातूनच आता अनेक शासकीय अधिकारी, अध्यापक, प्राध्यापक आदिवासी समाजातून आलेले आहेत.
नगरात किंवा अर्धनागरी समाजात येऊन वास्तव्य करणारे, जवळच्या ग्रामीण भागात येऊन राहिलेले असे जे आदिवासी आहेत, त्यांच्यात शिक्षणाच्या संस्कारांनी परिवर्तन झालेले आहे. ऑलिम्पिकमध्ये हॉकीत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारे जयपाल सिंघ मुंडा हे झारखंडमधील आदिवासी आहेत; शिवाय तिरंदाजीतील लिंबाराम, दीपिका कुमारी, कोमालिका बारी, मेरी कोम (भारोत्तोलक), दिलीप तिर्की (हॉकीपटू), कविता राऊत (धावपटू) इत्यादी हे नामवंत खेळाडू आदिवासी समाजातीलच आहेत. काही समुदायांच्या मते, आदिवासी हे वनवासी आहेत; पण ते बरोबर नाही. बाहेरून वनात गेलेला असेल, तो वनवासी. जे मूळचे अरण्यातच जन्माला आले, वाढले, मेले ते अरण्याचे आदिम वासी होत. अयोद्धेचा राजा श्रीराम हा वनवासी. तो आदिवासी नव्हे. अलीकडच्या काळात आदिवासींचे अनेक पोटजातींमध्ये विभाजन झालेले आहे. हा समाज शिकार करणारा आहे, त्यामुळे तो प्रामुख्याने मांसाहारी आहे. कंदमुळे, जंगलातील फळे, शेतात सांडलेले धान्य हे त्यांचे बाकीचे अन्न होय. आदिवासींच्या काही जमाती शेती करून जगणार्या आहेत. त्यांच्या मूळ देवतांचे अनेक विधी असतात; पण अलीकडे काही नागरी देव आणि संत हे आदिवासींमध्ये जाऊन बसलेले दिसतात.