

पुढारी ऑनलाईन : वरुण धवन व अनुष्का शर्मा यापूर्वी 'सुई धागा' या चित्रपटात एकत्रित दिसून आले होते. या उभयताची केमिस्ट्री प्रेक्षकांनाही त्यावेळी खूप आवडली होती. आता ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार असल्याचे संकेत आहेत.
वास्तविक, या चित्रपटात प्रारंभी जान्हवी कपूरला घेण्याचा दिग्दर्शकांचा विचार होता. मात्र, जान्हवीकडे वेळ नसल्याने अनुष्काला पसंती मिळाली. अनुष्काला चित्रपटाची कथा ऐकवण्यात आली आणि तिनेही याला पसंती दिली. सध्या या चित्रपटाच्या कथानकावर प्राथमिक चर्चा झाली असून वरुणबरोबरच अनुष्काने देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
या चित्रपटाला एटलीचे दिग्दर्शन लाभणार असून थलपती विजयचा चित्रपट 'थेरी'चा हा हिंदी रिमेक असणार आहे. 'थेरी'मध्ये समंथाची जी भूमिका होती, ती येथे अनुष्का साकारणार आहे. चित्रपटात दोन हिरॉईन असतील, असे संकेत असून एमी जॅक्सनशी देखील संपर्क साधला जाणार असल्याची चर्चा आहे.