प्रदूषणामुळे ’इंद्रायणी’चा श्वास गुदमरला

नदीत जलपर्ण जमून जलचरांचे अस्तित्व संकटात आले आहे
Indrayani River
इंद्रायणी नदी File Photo
प्रभाकर तुमकर

तळेगाव दाभाडे : इंद्रायणी नदीत अनेक नाल्यांचे पाणी थेट सोडले जात असल्यामुळे नदी अत्यंत प्रदूषित झाली आहे. पालखी सोहळा अवघ्या काही घटकांवर आला असतानादेखील इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात घट झालेली नाही. त्यातच वारकरी इंद्रायणी नदीत अंघोळ करतात, तेच प्रदूषित पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात. हा राजरोसपणे भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे, असे असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जलचरांचे अस्तित्व संकटात

मागील काही वर्षांपर्यंत मासे, खेकडे असे जलचर सामावून स्वच्छ, निर्मळ वाहणार्‍या इंद्रायणीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अलीकडे वाढलेल्या जलप्रदूषणामुळे दरवर्षी इंद्रायणीत लाखो जलचरांना जलसमाधी मिळत आहे. धार्मिक भावनांसह उद्योगांसाठीदेखील वरदान असलेली इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी टाहो फोडत आहे. पण प्रशासकीय अनास्था, नागरिकांचा हलगर्जीपणा, कारखान्यांमधून निघणारे केमिकलयुक्त पाणी रोखण्यासाठी प्रशासनाची डोळेझाक करत असल्यामुळे इंद्रायणी नदीचा श्वास गुदमरला आहे.

मावळ तालुक्यातील कुरवंडे गावातून इंद्रायणी नदी उगम पावते. पुढे ती देहूगाव, आळंदी मार्गे तुळापूर येथे जाऊन भीमा नदीला मिळते. भीमा नदी पुढे मुळा-मुठा नदीला घेऊन उजनी धरण मार्गे पंढरपूरला जाते. पंढरपूरमध्ये हीच भीमा नदी चंद्रभागा होते. त्यानंतर पुन्हा ती भीमा म्हणून वाहू लागते. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, देव इंद्रायणी थांबला. पंढरीचा पांडुरंग अळंदीशी आला, भक्तिभावाने एक रूप झाला. म्हणे मुक्ताबाई चमत्कार झाला, समाधी घेता हात थरथरला. एका जनार्दनी इंद्रायणी आठव, उधळुनी निघाले आळंदी हे गाव. अशा अनेक अभंगांमध्ये इंद्रायणीचा उल्लेख आढळतो.

Indrayani River
इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला मान्यता द्या : खासदार श्रीरंग बारणे

आरोग्य धोक्यात

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील चिखली घाटापर्यंत इंद्रायणी नदीला फेस येत नाही. तिथून पुढे बटवालवस्ती आणि कुदळवाडी नाल्यातून रसायन मिश्रित पाणी नदीत मिसळते. त्यामुळे प्रदूषित झाल्याने नदीला फेस येतो. कुदळवाडी येथील नाले दिवसापेक्षा रात्रीच्यावेळी अधिक क्षमतेने वाहतात. तुकाराम बीज, आषाढी वारी, कार्तिकी वारी अशा महत्त्वाच्या प्रसंगी देशभरातून लाखो भाविक देहू-आळंदी नगरीत येतात. धार्मिक आस्था जोडली असल्याने अनेकजण इंद्रायणी नदीत आंघोळ करतात. तर, काहीजण तेच पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात, असे प्रदूषणयुक्त पाणी प्यायल्याने अनेक गंभीर आजारांना निमंत्रण मिळते.

पालखी सोहळा काही तासांवर अन इंद्रायणीला फेस

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी देहूगावमधून जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी शुक्रवारी (दि. 28) तर अलंकापुरी आळंदीमधून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी शनिवारी (दि. 29) प्रस्थान ठेवणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शेकडो दिंड्या आणि लाखो वारकरी देहू आणि आळंदी येथे येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच इंद्रायणीचे प्रदूषण कमी होण्याचे नाव घेत नाही. अजूनही नदीला फेस आलेला आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेने वारकर्‍यांच्या जीवाशी खेळ लावला असल्याचे बोलले जात आहे.

इंद्रायणी सुधार प्रकल्प 577.16 कोटींचा

इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी शासनाने इंद्रायणी सुधार प्रकल्पाचा 577.16 कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल ऑगस्ट 2023 मध्ये राज्याच्या पर्यावरण विभागाकडे सादर केला आहे. राज्याने यास मान्यता दिली असून, आता हा अहवाल केंद्राच्या राष्ट्रीय नदीसंवर्धन संचालनालयाकडे (एनआरसीडी) पाठवण्यात आला आहे. यासाठी एनआरसीडीकडून 60 टक्के आणि राज्य शासन 40 टक्के अनुदान देणार आहे. या प्रकल्पांतर्गत इंद्रायणी नदीच्या तीरावर एकूण 48 गावांमधील पाणीप्रक्रिया करून नदीत सोडण्याबाबत नियोजन केले जात आहे.

इंद्रायणी नदीकाठावर लोणावळा नगर परिषद, तळेगाव दाभाडे नगर परिषद, आळंदी नगर परिषद, देहू नगरपंचायत, वडगाव नगरपंचायत, देहू कटक मंडळ, कुसगाव बुद्रुक, कामशेत-खडकाळे, इंदुरी ही 15 हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येची गावे, कार्ला, वरसोली, कान्हेवाडीतर्फे चाकण, येलवडी, आंबी, जांभूळ, कान्हे, गोळेगाव, सोळू, तुळापूर, मरकळ, नाणे, टाकवे बुद्रुक, सांगुर्डी, वडगाव शिंदे या 15 हजारांपेक्षा कमी लोकसंख्येच्या गावांत एसटीपी प्लांट उभारले जाणार आहेत. उर्वरित 24 गावांमध्ये इन सेतू नाला ट्रीटमेंटचा वापर करून मैला शुद्धीकरण करण्याचे काम केले जाणार आहे. येत्या दोन ते तीन वर्षांत इंद्रायणी नदी शंभर टक्के प्रदूषणमुक्त होईल. वारकर्‍यांचे शुद्ध इंद्रायणीचे स्वप्न निश्चित पूर्ण होईल, असा विश्वास लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकार्‍यांची उदासीनता

इंद्रायणी नदीच्या काठावर ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगर परिषद, महापालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे. इतर शासकीय यंत्रणा आहेत. पण इंद्रायणी नदीचे प्रदूषण कुणाच्याही नजरेस पडत नाही. राजकीय व्यक्तींची अनास्था, प्रशासकीय यंत्रणेची डोळेझाक, भविष्याबाबत कसलीही चिंता नसलेले कारखानदार आणि दिसत असूनही न दिसल्यासारखे करणारे सर्वसामान्य नागरिक यापैकी कुणीही इंद्रायणीचा आकांत लक्षात घेत नाही, हीच मोठी शोकांतिका आहे.

नदीवर जलपर्णीची चादर

अनेक गावांची तहान भागवत, शेतशिवार फुलवत इंद्रायणी वाहते. नदी शहरात येताच अनेक गटारी, नाले नदीत थेट मिसळतात. त्यामुळे नदीचा रंग बदलू लागतो. निर्मळ पाण्याला नाल्याचे रूप येते. मोकळी ढाकळी वाहणार्‍या इंद्रायणीत जलपर्णी दिसू लागते. नदी जशी शहराकडे जाईल तशी दुर्गंधीयुक्त, प्रदूषित पाण्यावर वाढणारी जलपर्णी मोठ्या प्रमाणात दिसू लागते. आळंदीजवळ जाताच नदी इतकी प्रदूषित होते की तिला अक्षरशः फेस येतो. अनेक दिवस हा फेस तसाच राहतो.

इंद्रायणी नदीत सांडपाणी सोडल्यामुळे अनेक प्रकारचे रोग निर्माण झाले आहेत. तेच जल तीर्थ म्हणून प्राशन करता येत नाही. याकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे. वारकर्‍यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करणे गरजेचे आहे.
हभप नितीनमहाराज काकडे, संस्थापक, श्री विठ्ठल परिवार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news