

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : दोन वर्षांच्या कोरोना संसर्गानंतर मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरांतून भीम सागर उसळला आहे. पहाटेपासूनच चैत्यभूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी आनुयांयीच्या रांगा लागल्या आहेत. सर्वांना अभिवादन करता यावे, यासाठी समता सैनिक दल, मुंबई पोलीस, महापालिका प्रशासन शिस्तबद्ध पद्धतीने भीम सैनिकांना रांगेतून दर्शनासाठी सोडत आहेत.
मुंबईसह राज्यातील खेड्यांपाड्यांतून आलेल्या आंबेडकरी आनुयांयीसह इतर जाती-धर्मातील नागरिकांनी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली आहे. सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान समता सैनिक दलाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सलामी दिली. तसेच पंचशील ध्वजाचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. यावेळी समता सैनिक दलासह भीम सैनिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
चैत्यभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर भीम सैनिक शिवाजी पार्ककडे जाताना दिसून येत आहेत. या ठिकाणी डॉ. आंबेडकर यांनी विविध विषयांवर लिहिलेली पुस्तके, ग्रंथ खरेदी करताना आंबेडकरी आनुयायी दिसून येत आहेत. तसेच बाबासाहेब, गौतम बुद्ध, महात्मा फुले, शिवाजी महाराज यांचे तैलचित्र घेण्यासाठीही भीम सैनिकांची गर्दी होत आहे. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या भीम सैनिकांना मुंबई महापालिकेसह विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांच्याकडून मोफत भोजन व पाणी वितरण केले जात आहे. काही ठिकाणी चहा, बिस्कीट, पोहे, शिरा या खाद्यपदार्थांचेही वाटप करण्यात येत आहे.
चैत्यभूमीच्या परिसरात सकाळपासूनच तरुणांचा गट जलसा आणि आंबेडकरी गीत गात आहेत. तसेच संविधान जनजागृती आणि स्वच्छ भूमी, चैत्य भूमी तरूणांच्या गटांकडून रस्त्यावर व शिवाजी पार्कवर पडलेला कचरा उचलण्यासाठी २०० स्वयंसेवक काम करत आहेत.
हेही वाचा :