

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेत गारगोटी येथील आनंद अशोक पाटील हा 325 क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. त्यास अल्प दृष्टी असतानादेखील त्याने त्या सर्वांवर मात करून यश मिळविले आहे.
कोल्हापूर प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरचे श्रीकांत कुलकर्णी व श्रीराज वाणी यांनीही यूपीएससी या परीक्षेत बाजी मारली आहे. आनंदला तिसर्या वर्षी दोन्ही डोळ्यांचा मोतीबिंदू झाला. त्यामुळे त्याच्या दोन्ही डोळ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. तीन वर्षांपासूनच त्याला अल्प दृष्टी आहे.
त्याचे प्राथमिक शिक्षण गारगोटी येथील नूतन मराठी येथे झाले असून माध्यमिक शिक्षण आंबोली येथील डायनामिक इंग्लिश पब्लिक स्कूलमध्ये झालेले आहे.
श्रीराज वाणी यांनी 430 वी रँक मिळवित यश मिळविले आहे. ते मूळचे भुसावळचे (जि. जळगाव) आहेत. कोल्हापुरात प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरमध्ये डिसेंबर 2020 मध्ये मुख्य परीक्षेआधी अभ्यास केला. त्यानंतर परीक्षेची पूर्ण तयारी केली. यूपीएससीत यश झाल्याचा आनंद आहे.
बर्याच वर्षाच्या कष्टाचे फळ मिळाल्याचे समाधान असल्याचे वाणी यांनी सांगितले. श्रीकांत कुलकर्णी हे कराड (जि. सातारा) येथील आहेत. यूपीएससीचा पाच वर्षे अभ्यास केला. अखेर शेवटच्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले आहे.
दरम्यान आपण घेतलेल्या खडतर परिश्रमाला यश आले असून या निकालाने भारावून गेल्याची प्रतिक्रिया आनंद पाटील यांनी व्यक्त केली वडील सेवा निवृत्त शाखा अभियंता अशोक पाटील यांनी अथक परिश्रमामुळे आनंदला यश प्राप्त झाल्याचे सांगितले.