

पहिल्या गर्भधारणेदरम्यान नकारात्मक विचार किंवा चिंता ही सर्वात जास्त सतावणारी भावना असते. पण, जर आधीच नैराश्य किंवा चिंतेचा सामना करत असाल तर मात्र ते अधिक कठीण होऊ शकते. आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी आपण जितकी काळजी घेऊ शकता तितकी काळजी घ्यावी. संतुलित आहाराचे सेवन करावे, चालण्याचा व्यायाम करावा, पुरेशी विश्रांती घ्यावी आणि गर्भधारणेदरम्यान जीवनसत्त्वांचे सेवन करावे. एखाद्याशी मनमोकळा संवाद साधावा.
संपूर्ण गर्भधारणेदरम्यान स्वभावात बदल हे वैशिष्ट्यपूर्ण असतात. सतत चिंता किंवा नैराश्य येणे हे अधिक गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. नियमित काळजी, शारीरिक बदल आणि गर्भधारणेशी संबंधित ताण या सर्वांवर परिणाम होऊ शकतो.
उदासीनता : दुःख, खिन्नता किंवा रागाची दीर्घकाळापर्यंत स्थिती उदासीनता म्हणून ओळखली जाते. गर्भधारणेपूर्वी काही स्त्रियांना नैराश्य जाणवू शकते. जसे की तिला गर्भवती असल्याबद्दल समाधान वाटत नसेल किंवा कामावर किंवा घरी खूप तणावाखाली असेल तेव्हादेखील हे सुरू होऊ शकते.
चिंता : ही संभाव्य परिणामांबद्दल काळजी किंवा चिंतेची भावना अवस्था आहे. गर्भधारणेदरम्यान अनेक गोष्टींचा तुमच्यावर तणाव येऊ शकतो. गर्भवती महिलांना द्विध्रुवीय विकार, ट्रॉमा-संबंधित तणाव विकार, सतत काळजी वाटणे, ओसीडी, आहाराबाबत समस्या-खाण्यावर नियंत्रण गमावून मोठ्या प्रमाणात अन्नाचे सेवन करणे याही इतर मानसिक आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात.
स्वतःवर जास्त दबाव आणू नका; आपल्या क्षमतांबद्दल वास्तववादी व्हावे आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा विश्रांती घ्यावी.
आवश्यक असल्याशिवाय, या काळात नोकरी बदलण्यासारखा महत्त्वपूर्ण बदल करणे टाळण्याचा प्रयत्न करावा.
सक्रिय राहावे (आपण व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा).
पौष्टिक अन्नाचे सेवन करावे.
जे तुमच्यात आत्मविश्वास निर्माण करतात त्यांच्यासोबत वेळ घालवावा.
ड्रग्ज किंवा अल्कोहोलचे सेवन टाळावे.
इतर गरोदर मातांशी संपर्क साधावा जेणेकरून तुम्ही एकमेकांना आधार देऊ शकाल.
तुम्हाला काही मानसिक आरोग्याविषयी समस्या असल्यास, तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा जेणेकरून गर्भधारणेदरम्यान आणि नंतर आवश्यक असलेली मदत मिळू शकेल.