खलिस्तानवाद्यांचा धोका वाढतोय…!

खलिस्तानवाद्यांचा धोका वाढतोय…!
Published on
Updated on

परकीय भूमीवर खलिस्तान समर्थकांची सक्रियता कमी न होता वाढतच आहे. ऑस्ट्रेलियातील इस्कॉन मंदिरावरचा हल्ला हे त्याचे ताजे उदाहरण आहे. भारतासाठी, तर ही धोक्याची घंटा आहे. परकीय भूमीवरच नाही, तर पंजाबमध्येदेखील कुरापती वाढत आहेत. खलिस्तान समर्थकांचा उच्छाद सरकारने वेळीच रोखला नाही, तर सुमारे 30 ते 35 वर्षांपूर्वी खलिस्तानचे गाडलेले भूत पुन्हा मानगुटीवर बसण्याची शक्यता आहे.

1980-90 च्या दशकात काश्मीर आणि पंजाब ही दोन राज्ये अशांत होती आणि दहशतवादी हल्ल्यांनी घायाळ होत होती. परंतु, भारत सरकारच्या कडक धोरणामुळे विशेषत: ऑपरेशन 'ब्लू स्टार'नंतर खलिस्तानच्या कारवायांना आळा बसला. अर्थात, यासाठी आपल्याला मोठी किंमत मोजावी लागली. कालांतराने खलिस्तानचे नामोनिशाण राहिले नाही, असे पंजाबी नागरिकांना आणि भारतीयांनाही वाटू लागले. थोडेफार राहिलेले खलिस्तानवादी परदेशात असून तेही आता गलितगात्र झाले आहेत, असा समज सर्वांचा झाला; पण गेल्या वर्षी लंडन येथे भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या तीन दिवस अगोदर खलिस्तान समर्थक संघटना 'शीख फॉर जस्टिस'ने मोर्चा काढला. यानंतर भारतासह अनेक देशांत या संघटनेने आपले अस्तित्व दाखवून दिले. आता ऑस्ट्रेलियाच्या इस्कॉन मंदिराच्या भिंतीवर खलिस्तान समर्थनार्थ लिहिलेल्या घोषणा गंभीर आहेत. कुरापतीतून खलिस्तानी समर्थक हे आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होते; पण सध्याच्या हालचाली पाहता वेगळ्या देशाची मागणी अजूनही शांत झालेली नाही, असे दिसते. ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचा विचार केल्यास व्हिक्टोरियन बहुसांस्कृतिक आयोगासमवेत विविध विचारसरणीच्या नेत्यांची बैठक झाली आणि दोन दिवसांनी इस्कॉन मंदिरावर हल्ला झाला.

ऑस्ट्रेलियात हिंदू मंदिरावर हल्ला होण्याची पंधरवड्यातील तिसरी घटना. मंदिरात भारतविरोधी घोषणाबाजी लिहिण्यात आली. 16 जानेवारी रोजी व्हिक्टोरियाच्या कॅरम डाऊन्स येथे ऐतिहासिक श्री शिव विष्णू मंदिरातही विटंबनेची घटना घडली. तसेच 12 जानेवारी रोजी मेलबॉर्न येथील स्वामी नारायण मंदिरात समाजकंटकांनी भारतविरोधी घोषणा दिल्या आणि फलक झळकावले.

'द ऑस्ट्रेलिया टुडे'च्या वृत्तानुसार, इस्कॉन मंदिराच्या भिंतीवर खलिस्तान झिंदाबाद लिहिण्यात आले होतेे. मंदिराच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, पूजास्थळी अशा कृत्यामुळे ते अत्यंत नाराज आहेत. व्हिक्टोरियन बहुसांस्कृतिक आयोगासह व्हिक्टोरियन बहुधर्म नेत्यांच्या तातडीच्या बैठकीनंतर दोन दिवसांनी हा हल्ला झाला आहे. वारंवार घडणार्‍या अशा घटनांबाबत ही बैठक झाली होती.

पूर्वी ठरावीक भागात असणारे खलिस्तान आता आपले जाळे पसरवत आहे आणि आपल्या मनसुबे तडीस नेत आहेत. या माध्यमातून भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. ऑस्ट्रेलियात सुमारे सव्वा सात लाख भारतीय नागरिक राहतात. तेथे आर्थिक आणि शैक्षणिक हित जोपसताना तेथील महसुलातही अनिवासी भारतीय भर घालत आहेत. कोणत्याही धार्मिक चेहर्‍याशिवाय राहणार्‍या भारतीयांच्या श्रद्धेला धक्का लावण्याचा कोणालाही अधिकार नाही. परकी भूमीवर भारतीय बहुसंख्याक समुदायाला टार्गेट करण्यामागे मोठी परकी शक्ती सक्रिय आहे, हे उघड आहे. वास्तविक भारतीय नागरिकांच्या कर्तृत्वाचा डंका जगात वाजत असताना काही असंतुष्ट गट भारतीय नागरिकांत भीतीचे वातावरण तयार करत आहेत. एक दशकापूर्वी ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवर एकामागून एक हल्ले झाले होते. मात्र, भारत सरकारने कडक धोरण अंगीकारल्यानंतर तत्कालीन ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान केव्हिन रड यांनी भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षा देण्याची हमी दिली. आज ऑस्ट्रेलियात सुमारे 77 हजार भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. भारतीय आणि ऑस्ट्रेलियाचे मित्रत्वाचे संबंध आहेत. उभय देशातील मुक्त व्यापार धोरण पाहिले, तर आपल्याला मैत्रीचे आकलन करता येईल. जागतिक व्यासपीठावर दहशतवादविरोधात प्रत्येक मोहिमेत ऑस्ट्रेलियाने भारताला साथ दिली आहे. अशा स्थितीत भक्कम नात्यांत फूट पाडण्याचे होणारे प्रयत्न हे हाणून पाडले पाहिजेत. गेल्या काही आठवड्यांतील हल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या उच्चायुक्तांनी भारतीय बहुसंख्य नागरिकांना मानसिक आधार देण्याचे काम केले; पण ऑस्ट्रेलियाच्या सरकारला आणखी ठोस उपाय करण्याची गरज आहे.

सुमारे दीड दशके पंजाबने दहशतवाद सहन केला. हजारो निष्पाप भारतीय नागरिक विविध ठिकाणांच्या दहशतवादी हल्ल्यात मारले गेले. आता जगात अनेक ठिकाणी खलिस्तानी समर्थक उपद्रव करत असताना पंजाबमध्येदेखील खलिस्तान सक्रिय होत आहे. यामागे पाकिस्तानचा मोठा हात आहे. पंजाबमध्ये पाकिस्तानातून गेल्या वर्षी अडीचशे ड्रोन आले. त्या तुलनेत पकडलेल्या ड्रोनची संख्या ही खूपच नगण्य राहिली. सीमा सुरक्षा दलाकडून सीमेवर गस्त घातली जात आहे; मात्र प्रत्येक पोलिस ठाण्यात सीमा सुरक्षा दलाचे जवान तैनात नाहीत. सीमेवरची वाढती घुसखोरी पाहता ड्रोनची तपासणी आणि समाजकंटकांना अटक करण्यासाठी सीमा सुरक्षा दलाची व्याप्ती वाढविण्यात आली आणि त्याचा फायदाही होत आहे; पण खलिस्तानी समर्थक हल्ले घडवून आणत आहेत. मोहाली येथील पोलिसांच्या गुप्तचर खात्याच्या मुख्यालयावर हल्ला झाला. भारत-पाकिस्तान सीमेपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या सरहाली ठाण्यावर रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेडने (आरपीजी) हल्ला झाला. त्याची जबाबदारी खलिस्तान दहशतवाद्यांनी घेतली. राज्याच्या विविध भागांत खलिस्तान समर्थनार्थ पोस्टर झळकत आहेत. पंजाबमध्ये शिवसेनेचे नेते सुधीर सुरी यांची दिवसाढवळ्या हत्या होते, अनेक शहरांत खलिस्तानचे पोस्टर लागतात. कॅनडा आणि अमेरिकेतून सूत्रे हलविणारा 'शीख फॉर जस्टिस'चा संस्थापक गुरपवंत सिंग पन्नूविरुद्ध इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस काढली जात नाही. म्हणून घातपाती कारवायांना ठेचायचे की पुढे जाऊ द्यायचे, हे सरकारच्या हातात आहे. अन्य एक जण स्वत:ला भिंद्रनवाले असल्याचे सांगत आहे. ही बाब दुर्लक्षिण्याजोगी नाही. खलिस्तानी समर्थक राज्यात फुटिरतेचे बीज पुन्हा रोवत आहेत. नशा, बेरोजगारी या मुद्द्यांच्या नावाखाली कोणीही सहजपणे युवकांना आपल्या बाजूने खेचताना दिसत आहे. या गोेष्टी वेळीच रोखणे गरजेचे आहे. खलिस्तानला पाठिंबा देणारा सिमरनजित सिंग मान हा पंजाबच्या संगरूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आला, ही बाब गंभीर आहे. केंद्र सरकार पंजाबबाबत गंभीर आहे. अर्थात, पंजाबच्या भूमीत खलिस्तानच्या कुरापती सुरू ठेवण्यासाठी एखादा पार्श्वभूमी तयार करत असेल, तर केंद्र आणि त्याच्या संस्था त्यांचे उच्चाटन करण्यास मागे हटणार नाहीत, हे देखील तितकेच खरे. यासाठी भारतीय गुप्तचर संस्था ही पाकिस्तानची आयएसआय, खलिस्तानी दहशतवादी आणि स्थानिक राजकारणांवर लक्ष ठेवत आहे.

– विश्वास सरदेशमुख, आंतरराष्ट्रीय अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news