

कोल्हापूर : सागर यादव : कोल्हापुर येथील 'सारथी' उपकेंद्राच्या निमिर्र्तीला सुमारे एक वर्षाचा कालावधी लोटला तरी विस्तारासाठी आवश्यक असणारी 5 एकर जागा संस्थेच्या ताब्यात आलेली नाही. यामुळे केंद्राचा विकासाला मर्यादा येत असून, यामुळे लाभार्थी असणार्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) मराठा समाजातील युवक व युवतींना सक्षम बनविण्यासाठी त्यांच्यातील उद्यमशीलता विकसित करण्यासाठी शैक्षणिक, कृषिपूरक, औद्योगिक क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात.
'सारथी'चे कोल्हापुरातील उपकेंद्र राजाराम कॉलेजच्या कमवा व शिका योजनेच्या हॉस्टेलच्या इमारतीत सुरू करण्यात आले आहे. सध्या तेथे तीन कर्मचारी आहेत. इमारतीसह सभोवतालची 5 एकर जागेची मागणी 'सारथी'ने सरकारकडे केली आहे. कोल्हापूरसह राज्यातील आठ उपकेंद्रांच्या जागेसाठीचे आणि आवश्यक असणार्या 273 कर्मचार्यांच्या नियुक्तीसाठीचे प्रस्ताव शासनाच्या संबंधित विभागांकडे पाठविण्यात आले आहे.
या जागा 'सारथी'कडे आल्यानंतरच स्वत:ची प्रशासकीय इमारत 250 मुले व 250 मुलींसाठी मोफत वसतिगृह, ग्रंथालय, लेक्चर हॉल, सभागृह, मैदान, अंतर्गत रस्ते, सोयी-सुविधांच्या कामाला मर्यादा आल्या आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांनीही याबाबत 'सारथी'च्या अधिकार्यांशी बैठक घेऊन पुढील कार्यवाहीसाठीचे आश्वासन दिले आहे.
कोल्हापूरात 'सारथी'चे उपमुख्य केंद्र व्हावे, अशी पहिल्यापासूनची मागणी आहे. ती पूर्ण करण्याबरोबरच राज्यभर सारथीचे कार्य सक्षमपणे व्हावे, याकरिता सक्षम संचालक व अधिकारी वर्गाची नियुक्ती तातडीने होणे गरजेचे आहे. याशिवाय बंद पडलेली 'तारादूत' योजना पूर्ववत सुरू करावी.
– इंद्रजित सावंत, मराठा संघटना समन्वयक
खा. संभाजीराजे यांनी नुकत्याच केलेल्या बेमुदत उपोषणाची तातडीने दखल घेत राज्य सरकारने मराठा समाजाच्या इतर मागण्यांबरोबरच 'सारथी' संस्थेबद्दल विविध निर्णय घेतले आहेत. यात 'सारथी'कडून कौशल्य विकासाचे कार्यक्रम एका महिन्यात सुरू केले जातील, तज्ज्ञांच्या सल्ल्याने 'सारथी व्हिजन डॉक्युमेंट' 30 जून 2022 पर्यंत तयार केले जाईल, रिक्तपदे व 'सारथी'च्या 8 उपकेंद्रांसाठी जमिनी देण्याचा प्रस्ताव 15 मार्च 2022 रोजी मंत्रिमंडळास सादर करून मान्यता देणार, या निर्णयांचा समावेश आहे.