कर्णधार बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा निम्मा संघ गारद

कर्णधार बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा निम्मा संघ गारद
Published on
Updated on

एजबस्टन : वृत्तसंस्था भारताच्या 416 धावांना उत्तर देताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. फक्‍त 27 धावांत अ‍ॅलेक्स लीस (6) आणि झॅक क्राऊली (9) हे त्यांचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले होते. या दोघांना जसप्रीत बुमराहनेच बाद केले. 31 धावा झाल्यानंतर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. काही काळानंतर पाऊस थांबला आणि पुन्हा खेळ सुरू झाला. पण बुमराहने इंग्लंडला तिसरा धक्‍का देताना ओली पोपला बाद केले. दहा धावा करणार्‍या पोपने दुसर्‍या स्लीपमधील श्रेयस अय्यरकडे झेल दिला. पण सोळाव्या षटकात पावसाने पुन्हा सुरुवात केली. यात जवळपास दीड तासाचा खेळ वाया गेल्यानंतर पुन्हा खेळ सुरू झाला.

ज्यो रूट आणि जॉनी बेअरस्टो हे मैदानावर होते. दोघांनी सावध पवित्रा घेत विकेट राखण्यावर भर दिला. पण मोहम्मद सिराजने भारतासाठी नेहमी धोकादायक ठरणार्‍या ज्यो रूटला एका अप्रतिम चेंडूवर ऋषभकडे झेल देण्यास भाग पाडले. रूटने 31 धावा केल्या.
यानंतर आलेला नाईट वॉचमन जॅक लिच याला शमीच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने जीवदान दिले. परंतु शमीने त्याला याचा फायदा घेऊ दिला नाही. आपल्या पुढच्या षटकात लीचला ऋषभकडे झेल देण्यास भाग पाडले. यानंतर एक षटक होऊन दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी जॉनी बेअरस्टो (12) व बेन स्टोक्स (0) हे नाबाद होते. यापूर्वी जडेजाने 2018 मध्ये राजकोटमध्ये विंडीजविरुद्ध आणि मार्च 2022 मध्ये मोहालीत श्रीलंकेविरुद्ध कसोटी शतक झळकावले होते. या शतकाबरोबरच जडेजाने इंग्लंडमध्ये 500 कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. इंग्लंडमधील 11 कसोटी सामन्यांमध्ये जडेजाने 30पेक्षा जास्त सरासरीने ही कामगिरी केली आहे. यापूर्वी, इंग्लंडमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 86 होती. भारताकडून एकाच कसोटी डावात दोन डावखुर्‍या फलंदाजांनी शतके ठोकण्याची ही तिसरी वेळ आहे. या सामन्यात जडेजाच्या आधी डावखुर्‍या ऋषभ पंतनेही 146 धावांची खेळी केली.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ऋषभ पंतच्या साथीने टीम इंडियाचा गडगडलेला डाव सावरणार्‍या रवींद्र जडेजाने दुसर्‍या दिवशी शतक पूर्ण केले. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमीनेही सुरेख फटके मारताना त्याला चांगली साथ दिली. 92 धावांवर असताना जडेजाचा दुसर्‍या स्लिपमध्ये झेल सुटला अन् तो चेंडू चौकार गेला. त्यानंतर आणखी एक चौकार मारून त्याने शतक पूर्ण केले. त्याचे हे कसोटीतील तिसरे शतक अन् इंग्लंडविरुद्धचे पहिलेच शतक ठरले. जसप्रीत बुमराहने अखेरच्या विकेटसाठी दमदार फटकेबाजी करताना भारताची धावसंख्या पहिल्या डावात 416 वर नेली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या आघाडीच्या फळीची दाणादाण उडवली. दिवसअखेरीस इंग्लंडच्या 5 बाद 84 धावा झाल्या होत्या.

पहिल्या दिवशी भारताची अवस्था 5 बाद 98 अशी झाली होती. त्यानंतर ऋषभ व जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी विक्रमी 222 धावांची भागीदारी केली. ऋषभने 111 चेंडूंत 19 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 146 धावा केल्या. ऋषभ पंतने 89 चेंडूंत हे शतक पूर्ण केले. इंग्लंडमध्ये भारताकडून हे दुसरे जलद शतक ठरले. यापूर्वी 1990मध्ये मोहम्मद अझरुद्दीनने लॉर्डस् कसोटीत 87 चेंडूंत शतक झळकावले होते. ऋषभने 111 चेंडूंत 146 धावा केल्या आणि त्याचा स्ट्राईक रेट हा 131.53 इतका होता. स्ट्राईक रेटनुसार भारताकडून ही दुसरी जलद सेंच्युरी ठरली. 1996मध्ये कोलकाता कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अझरुद्दीनने 141.55 च्या स्ट्राईक रेटने 77 चेंडूंत 109 धावा केल्या होत्या.

दुसर्‍या दिवशी जडेजा व मोहम्मद शमी यांनी दमदार खेळ करताना सुरेख फटके मारले. 70 चेंडूंत 48 धावांची ही भागीदारी स्टुअर्ट ब्रॉडने संपुष्टात आणली. शमी (16) ची विकेट घेत ब्रॉडने कसोटीत 550 वा बळी टिपला. त्यानंतर जडेजाची विकेट पडली. जेम्स अँडरसनने भन्नाट यॉर्कर टाकून ही विकेट मिळवली. जडेजा 194 चेंडूंत 13 चौकारांसह 104 धावांवर बाद झाला. भारताचा पहिला डाव 416 धावांवर संपुष्टात आला. जसप्रीत बुमराहने 16 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 31 धावा केल्या. जेम्स अँडरसनने 60 धावा देताना 5 विकेटस् घेतल्या.

भारत : प. डाव : शुभमन गिल झे. क्राऊली गो. अँडरसन 17, चेतेश्‍वर पुजारा झे. क्राऊली गो. अँडरसन 13, हनुमाविहारी पायचित गो. पॉटस 20, विराट कोहली त्रि. गो. पॉटस 11, ऋषभ पंत झे. क्राऊली गो. रूट 146, रवींद्र जडेजा त्रि. गो. अँडरसन 104, शार्दुल ठाकूर झे. बिलिंग्ज गो. स्टोक्स 1, मोहम्मद शमी झे. लीच गो. ब्रॉड 16, जसप्रीत बुमराह नाबाद 31, मोहम्मद सिराज झे. ब्रॉड गो. अँडरसन 2. अवांतर 40, एकूण 84.5 षटकांत सर्वबाद 416 धावा. गोलंदाजी : जेम्स अँडरसन 21.5-4-60-5, स्टुअर्ट ब्रॉड 18-3-89-1, मॅथ्यू पॉटस 20-1-105-2, जॅक लीच 9-0-71-0, बेन स्टोक्स 13-0-47-1, ज्यो रूट 3-0-23-1. इंग्लंड : प. डाव : 27 षटकांत 5 बाद 84. जॉनी बेअरस्टो 12, बेन स्टोक्स 0 (खेळत आहेत)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news