

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : दसरा चौकातील मैदानावर शुक्रवारी करवीरचा ऐतिहासिक दसरा सोहळा उत्साहात झाला. मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणांच्या साक्षीने आणि कोरोनाचे नियम पाळत विविध क्षेत्रांतील निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत यंदाचा सोहळा पार पडला.
सायंकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी शाहू महाराज यांच्या हस्ते लकडकोटावरील शमी पूजन झाले. यानंतर खासदार संभाजीराजे, मालोजीराजे, शहाजीराजे, यशराजराजे व यशस्विनीराजे यांनी देवींची आरती व पूजन करताच उपस्थितांनी सीमोल्लंघन करून सोने लुटले.
सोहळ्यास डॉ. प्रतापसिंह जाधव, डॉ. योगेश जाधव, डॉ. डी. वाय. पाटील, मंत्री सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, खा. संजय मंडलिक, आ. चंद्रकांत जाधव, आ. प्रा. जयंत आसगावकर, राहुल पाटील, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलिस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे, डॉ. संजयसिंह चव्हाण, डॉ. डी. टी. शिर्के, डॉ. संजय डी. पाटील, शिवराज नाईकवडे, व्ही. बी. पाटील, डॉ. रमेश जाधव, इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक, गणी आजरेकर, सचिन चव्हाण, आर. के. पोवार, राहुल चिकोडे, अधीक्षक तिरुपती काकडे आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पोलिस विभाग व टी. ए. बटालियनच्या बँड पथकाने करवीर संस्थानचे गीत वाजवून त्यांचे स्वागत केले. तर मानकर्यांनी बंदुकीच्या फैरी झाडल्या. दसरा महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती कुटुंबातील सदस्यांचे स्वागत प्रथेप्रमाणे औक्षण करून केले. राजर्षी शाहू वैदिक स्कूलच्या पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधिवत लकडकोटावरील शमीचे पूजन व देवीची आरती करण्यात आली. इतिहास अभ्यासक अॅड. प्रसन्न मालेकर यांनी दसरा सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.
दसरा चौकातील मुख्य सोहळ्यानंतर छत्रपतींच्या हुजर स्वार्यांसह करवीरनिवासिनी श्री अंबाबाई व तुळजाभवानीच्या पालख्या मानकर्यांसह प्रथेप्रमाणे पंचगंगा नदी घाटावरील 'संस्थान शिवसागर' व सिद्धार्थनगर येथे नेण्यात आल्या.
गतवर्षी कोरोनाच्या महामारीमुळे इतर सण-उत्सवांप्रमाणेच कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा प्रतीकात्मक पद्धतीने साजरा करण्यात आला होता. जुना राजवाडा येथे बंदिस्त पद्धतीने शमी पूजन करण्यात आले होते. यंदा कोरोनाचा कहर कमी झाल्याने पारंपरिक पद्धतीने सीमोल्लंघनाचा सोहळा दसरा चौकातच करण्याचा निर्णय छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट व दसरा महोत्सव समिती नवीन राजवाडा यांच्या वतीने घेण्यात आला होता. प्रतिवर्षी सोहळ्यास होणारी हजारो लोकांची गर्दी टाळण्यासाठी निमंत्रित लोकांनाच प्रवेश देण्यात आला होता. दसरा चौकाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दसरा चौकातील सोहळा नागरिकांना पाहता यावा यासाठी प्रशासनाने शहरात 6 ठिकाणी एलईडी स्क्रीनची व्यवस्था केली होती.
मुख्य सोहळ्यापूर्वी करवीरनिवासिनी अंबाबाई, जुना राजवाडा येथील तुळजाभवानी आणि गुरू महाराज यांच्या पालख्यांचे लवाजम्यासह भाऊसिंगजी रोडवरून दसरा चौकात आगमन झाले. यानंतर नवीन राजवाडा येथून हुजूर स्वार्या (छत्रपती घराण्यातील सदस्य) यांचे ऐतिहासिक मेबॅक मोटारीतून दसरा चौकात आगमन झाले.