

भारतीय संस्कृतीमध्ये बांगडी म्हणजे सौभाग्याचे लेणं समजलं जातं. एखादी महिला किंवा मुलगी बांगडी न घालता तशीच वावरताना दिसली की, घरातील किंवा शेजारच्या ज्येष्ठ महिला, अशी मुंडीच का फिरतेस? एखादी तरी बांगडी घाल ना हातात? बरं दिसतं का हे, असा उपदेशाचा डोस पाजतात.
मग, मुंडं फिरणं बरं नव्हे म्हणून दोन ते तीन तरी बांगड्या घालतात. स्वत:ला कितीही मॉडर्न लूक देणारी ऑफिसवुमन असली तरी एखादी बांगडी किंवा फॅशनेबल जाडजूड एकच मोठी बांगडी घालतेच. हल्ली बांगड्यांची मात्र फॅशन जोरात दिसून येते. बाजारात वेगवेगळ्या रंगाच्या, स्टाईलच्या बांगड्या दिसून येतात. काचेच्या तसेच लाखेच्या आणि कडे अशा बांगड्यांचा बाजारात ट्रेंड दिसून येतो.
लाकडाला गोलाकार कापून त्यावर नक्षी कोरून कडे किंवा बांगड्या आकर्षून घेतात. तसेच त्यावर सप्तरंगांमध्ये पेंटिंग करून पॉलिश करूनही अशा ट्रॅडिशनल डे किंवा घरगुती समारंभात वापरल्या जातात. हाताची शोभा वाढवणार्या बांगड्या व कडे इंडियन आणि वेस्टर्न वेशभूषेतही उठावदार दिसतात. हल्ली जिन्स किंवा कुर्त्यावरही आकर्षक आणि मॅचिंगच्या बांगड्या वापरल्या जातात.
सुंदर रंगीबेरंगी असलेल्या बांगड्या बाजारात 50 रुपयांपासून 150 ते 200 रुपयांपर्यंत मिळतात. महिलावर्गात तर साडीवर मॅचिंग बांगड्या घालण्याची क्रेझच आहे. अगदीच घरातील पारंपरिक काही कार्यक्रम असतील, तर सोन्याच्या बांगड्या आणि काचेच्या बांगड्या वापरल्या जातात. इतरवेळी मात्र मॅचिंगच्या बांगड्या किंवा राजस्थानी आणि गुजराथी पद्धतीच्या मोठ्या तोड्यांसारख्या रंगीबेरंगी बांगड्या घालणेही स्टाईल बनली आहे. अशा या विविधरंगी आणि विविधढंगी बांगड्या महिलावर्गात महत्त्वाचे स्थान बनून राहिल्या आहेत.
हेही वाचा :