

मुंबई :
जीवनात एक दालन बंद झाले की दुसरे उघडलेले असते असे म्हटले जाते. त्यामुळे निराश होण्यापेक्षा नव्या उमेदीने जीवनाची सुरुवात केली जाते. अशाच एका तरुणाने प्रेरणादायी काम केले आहे. या तरुणाला 'एमबीए'साठी प्रवेश हवा होता. मात्र तो न मिळाल्याने त्याने मध्यप्रदेशमधून मुंबईत येऊन चहाची टपरी सुरू केली. आता तो या व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई करीत आहे.
या तरुणाचे नाव आहे प्रफुल्ल. धारमधील लबरावदा या लहानशा गावातील हा तरुण 'एमबीए' करण्याची इच्छा बाळगून होता. त्यासाठी त्याने गुजरातच्या अहमदाबाद येथे जाऊन तयारी सुरू केली. मात्र त्याला प्रवेश मिळू न शकल्याने त्याने नोकरीऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. वडिलांकडून शिक्षणाच्या नावाखाली दहा हजार रुपये घेऊन त्याने एका महाविद्यालयाबाहेर चहाचा स्टॉल लावला. 'इंग्रजी बोलणारा चहावाला' अशी त्याची प्रसिध्दी झाली आणि त्याच्या चहाची चवही आवडल्याने हळूहळू त्याच्या या व्यवसायाचा विस्तार झाला. आता संपूर्ण देशात त्याच्या 'एमबीए चायवाला' या नावाने 22 हून अधिक शाखा असून तो लाखो रुपयांची कमाई करीत आहे.