

मॉस्को : पृथ्वीच्या कक्षेत फिरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये गंभीर समस्या निर्माण होत असल्याचे म्हटले जात आहे. आता तेथील एका भागामध्ये मोठी भेगही पडल्याचे समोर आले आहे. रशियाच्या अंतराळवीरांनी याबाबतची माहिती दिली आहे. भविष्यात ही भेग अधिक रुंद होऊ शकते असा इशाराही त्यांनी दिला आहे. या भेगेतून हवा जाते का हे स्पष्ट केलेले नाही.
यापूर्वीही अंतराळवीरांनी स्थानकावरील उपकरणे जुनी झाल्याचे म्हटले होते. 2025 नंतर ही उपकरणे तुटू शकतात असेही सांगण्यात आले होते. अलीकडेच अंतराळस्थानक काही वेळ नियंत्रणाच्या बाहेरही गेले होते. सॉफ्टवेअरमध्ये माणसाकडून झालेली ही चूक होती असे वैज्ञानिकांनी सांगितले होते.
रॉकेट अँड स्पेस कॉर्पोरेशन एनर्जियाचे मुख्य अधिकारी व्लादिमीर सोलोव्योव यांनी म्हटले आहे की आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या जारया मॉड्यूलच्या काही ठिकाणी पृष्ठभागावर भेगा दिसून आल्या आहेत. तेथील इन-फ्लाईट सिस्टीम 80 टक्क्यांपर्यंत मुदतबाह्य झाली आहे. गेल्यावर्षीच बहुतांश उपकरणे 'एक्स्पायर' झाली होती.
अशी उपकरणे बदलणे गरजेचे आहे. रशियाच्या ज्या जारया कार्गो मॉड्यूलमध्ये भेगा पडल्या आहेत ते 1998 मध्ये लाँच करण्यात आले होते. सध्याचा त्याचा वापर स्टोरेजसाठी केला जातो. रशियन स्पेस एजन्सी 'रॉसकॉसमॉस'चे म्हणणे आहे की असेच सुरू राहिले तर स्पेस स्टेशन 2030 पर्यंत निकामी होऊन जाईल!