नवी दिल्ली : पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी झालेल्या या भेटीत पंतप्रधानांनी दिलजीत दोसांझचे कौतुक केले. राजकीय वर्तुळासह देशभर ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे. भेट घेतल्यानंतर दिलजीत दोसांझने एक व्हीडिओ शेअर करत ही भेट अविस्मरणीय असल्याचे म्हटले.
भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी "दिलजीतबरोबरची चर्चा खूपच छान झाली. त्यांच्या व्यक्तिमत्वात प्रतिभा आणि परंपरा यांचा मिलाफ आहे. आम्ही संगीत, संस्कृती आणि अनेक गोष्टींबद्दल बोललो,” अशा भावना व्यक्त केल्या.
पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर दिलजीत दोसांझने सोशल मीडियावर या भेटीचा व्हिडीओ शेअर केला. यात पंतप्रधान मोदींना पाहताच दिलजीत दोसांझने त्यांना नमस्कार केला. पंतप्रधानांनीही त्यांचे स्वागत केले. देशभर दौरा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भारत किती महान आहे याबाबतची प्रचिती आल्याचे दिलजीत दोसांझ सांगताना दिसत आहे. दोघांमध्ये योगावरही चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, योगामध्ये अद्भुत शक्ती आहे. ज्याने त्याचा अनुभव घेतला आहे त्यालाच ते कळू शकेल. व्हिडिओत दिलजीत दोसांझ पंतप्रधान मोदींसमोर गुरूनानकांचे गाणे गातो, यावेळी पंतप्रधान मोदीही टेबल वाजवून दाद दिली.
देशातल्या शेतकरी आंदोलनावेळी दिलजीतने केंद्र सरकारवर सडकून टीका केली होती. मात्र त्याने पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याने आंदोलक शेतकऱ्यांना ही गोष्ट खटकली. त्यांनी या भेटीवर संताप व्यक्त केला. 'दिलजीतला शेतकऱ्यांची काळजी असती तर त्याने इथे येऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असता', असे शंभू सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी म्हटले आहे.