

डोंबिवली : कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर आजोबांचे वय असलेल्या दोघा नराधमांनी आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत अख्तर मणियार (वय ६०) आणि सलीम शेख (वय ६२) या दोन्ही संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
या नराधमांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी पोलिसांनी हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी शिवसेनेचे स्थानिक नेते नगरसेवक महेश गायकवाड यांनी केली आहे.
कोळसेवाडीतील एका बंद घरातून रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका मुलीच्या रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज येत होता. हा आरडाओरडा ऐकून आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांना जाग आली. रहिवाशांनी तात्काळ त्या घरात जाऊन पाहिले असता, तेथील भीषण दृश्य पाहून संताप अनावर झाला. नागरिकांनी या घटनेची माहिती त्वरित कोळसेवाडी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, तिथे पीडित मुलीसह दोन्ही आरोपी आढळून आले.
पीडित मुलीने हिंमत दाखवून पोलिसांत तक्रार दाखल केली. तिच्या जबानीवरून कोळसेवाडी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी एकजण एपीएमसी मार्केटमध्ये चहा विक्रीचा व्यवसाय करतो, तर दुसरा रिक्षाचालक आहे. ज्या घरात हा गुन्हा घडला, ते घर भाड्याने देण्यात आले होते. पीडित मुलगी सध्या सुरक्षित असून तिला वैद्यकीय तपासणीनंतर कायदेशीर समुपदेशन सहाय्य पुरवण्यात आले आहे. पोलीस आता आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासत असून या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेत आहेत.