Agriculture Advisory: खरीप पिकांची काळजी कशी घ्यावी?

खरीप हंगामात शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज नियमितपणे पाहावा, पिकांची सातत्याने पाहणी करावी आणि कोणतीही उपाययोजना करण्यापूर्वी ही माहिती पाहा.
Agriculture
Agriculture File Photo
Published on
Updated on

वाशिम : यंदाच्या खरीप हंगामात काही भागांमध्ये पावसाचा खंड पडल्याने जमिनीतील ओलावा कमी होत असून खरीप पिकांवर पाण्याचा ताण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी घाबरून न जाता शास्त्रीय पद्धतीने पिकांचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांनी केले आहे.

जमिनीत पुरेसा ओलावा नसताना उगवणीनंतर वापरावयाची तणनाशके तसेच विविध संप्रेरके, बुरशीनाशके आणि कीटकनाशकांची अनावश्यक फवारणी टाळावी. पाण्याच्या ताणाच्या अवस्थेत रासायनिक फवारणीमुळे पिकांवर अतिरिक्त ताण निर्माण होण्याची शक्यता असते.

जमिनीत किंचित ओलावा असल्यास हलका डवऱ्याचा फेर देऊन अंतरमशागत करावी. मात्र खोल मशागत टाळावी. मशागत करताना पिकांच्या मुळांना इजा होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. सलग सात ते आठ दिवस पावसाचा खंड राहून पिके सुकण्याची लक्षणे दिसू लागल्यास कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने १३:०:४५ (पोटॅशियम नायट्रेट) हे खत १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारावे. ज्या शेतकऱ्यांकडे संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे त्यांनी ठिबक किंवा तुषार सिंचनाद्वारे हलके पाणी देऊन पिकांवरील ताण कमी करावा.

सोयाबीन पिकात खोडमाशी, चक्रभुंगा, हिरवी उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी व केसाळ अळी यांच्या व्यवस्थापनासाठी प्रथम एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा. गरज भासल्यास पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. तसेच कामगंध सापळे, पिवळे चिकट सापळे आणि पक्षी थांबे यांचा वापर करावा. रासायनिक कीटकनाशकांचा वापर केवळ कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.

हळद पिकामध्ये लागवडीनंतर ४५ ते ५० दिवसांनी शिफारशीनुसार नत्राची मात्रा द्यावी. मात्र खताचा योग्य परिणाम होण्यासाठी संरक्षित सिंचन उपलब्ध असल्यास सिंचन करणे आवश्यक आहे. हळद, संत्रा, मोसंबी, लिंबू, पेरू तसेच इतर फळबाग आणि भाजीपाला पिकांमध्ये पावसाच्या ताणाच्या काळात रासायनिक उत्पादनांचा अनावश्यक वापर टाळावा. त्याऐवजी ट्रायकोडर्मा, पीएसबी, सुडोमोनास आणि मेटारायझियम यांसारख्या जैविक निविष्ठांचा कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापर करावा.

शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज नियमितपणे पाहावा, पिकांची सातत्याने पाहणी करावी आणि कोणतीही उपाययोजना करण्यापूर्वी कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच निर्णय घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news