

महाडः टेम्पोचा टायर पंक्चर काढण्यासाठी थांबलेल्या चौघांना भरधाव दुचाकीने उडवल्याची घटना नुकतीच महाड तालुक्यात घडली असून यामध्ये एकाच दुर्दैवी मृत्यू तर अन्य जखमी झाले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की फिराश उमर मुगरुसकर, शिवम शिवदास साळवी, अकीब अब्दुल मजीद मुगरूसकर आणि यशवंत हरिश्चंद्र म्हाप्रळकर चौघेही राहणार म्हाप्रळ, तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी यांचा टेम्पो (MH 08 AP 3352) पंक्चर झाला होता. शुक्रवार 13 डिसेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास महाड कहराजवळील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गवर केंबुर्ली गावाच्या हद्दीत पंक्चर काढण्यासाठी हे चौघे टेम्पोजवळ उभे होते. त्याचवेळी मुंबईकडून महाडच्या दिशेने येणाऱ्या सूरज चंद्रकांत सावंत राहणार खैरे, तालुका महाड, जिल्हा रायगड याने आपल्या मोटरसायकलने (MH 06 BJ 4534 ) भरधाव येत या चौघांना जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वारासह हे चौघेही जखमी झाले. या सर्वांना ग्रामीण रुग्णालय महाड येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. यापैकी यशवंत हरिश्चंद्र म्हाप्रळकर यांची प्रकृती गंभीर असल्याकारणाने त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले होते परंतू उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सदर घटनेची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अतिवेगाने वाहन चालवून अपघात करून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल सुरज चंद्रकांत सावंत याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.