

जळगाव : येथील पत्रकार विक्रम कापडणे यांचा कॅमेरा हिसकावून घेणे व त्यातील मेमरी कार्ड काढणे, दमदाटी करणे याबाबत सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्यावर जळगांव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की जळगाव महानगरपालिकेच्या लेखा विभागाच्या बाहेर पत्रकार विक्रम कापडणे हे कॅमेऱ्याने शूटिंग करत असताना, सहाय्यक आयुक्त गणेश चाटे तेथे आले आणि त्यांनी त्यांचा कॅमेरा जबरदस्तीने हिसकावून घेतला एका कर्मचाऱ्याजवळ दिला आणि त्यातील मेमरी कार्ड काढून घेतले. विक्रम कापडणे यांनी सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्या विरोधात जळगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कलम ११५ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
विक्रम कापडणे यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या निर्णयांनुसार कोणत्याही शासकीय कार्यालयात, विशेषतः सार्वजनिक हिताच्या दृष्टीने शूटिंग करणे कायदेशीर आहे. सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांना याबाबत माहिती दिल्यानंतरही त्यांनी अरेरावी केली व अधिकाराचा गैरवापर करत कॅमेरा काढून घेतला.
उच्च न्यायालयाच्या विविध निकालांनुसार, शासकीय कार्यालयांमध्ये पारदर्शकता टिकवण्यासाठी व जनहिताच्या मुद्द्यांसाठी शूटिंग करण्यास मनाई नाही. अशा परिस्थितीत, शासकीय अधिकारी जर त्यांच्या पदाचा गैरवापर करत पत्रकारांना काम करण्यापासून रोखत असतील तर तो कायद्याचा भंग मानला जातो. या प्रकरणावर पोलीस तपास सुरू आहे. पत्रकार संघटनांकडूनही या घटनेचा निषेध केला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पारदर्शकतेसाठी पत्रकारितेचे महत्त्व असून, अशा घटना पत्रकारांना त्यांच्या कामापासून रोखण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप अनेक पत्रकारांनी केला आहे.