

खानापूर : बेळगाव आणि खानापूर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा गांभीर्याने आढावा घेत, जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवार, दि. ७ जुलै रोजी बेळगाव व खानापूर तालुक्यातील सर्व अंगणवाडी केंद्रे, प्राथमिक व माध्यमिक शाळा, तसेच बारावीपर्यंतच्या सर्व महाविद्यालयांना अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी रात्रीच यासंदर्भातील आदेश जारी केले असून, हा निर्णय बेळगाव व खानापूर तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील सर्व सरकारी आणि खाजगी शैक्षणिक संस्थांना लागू राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. तसेच झाडे कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे आणि वाहतूक विस्कळीत होणे अशा घटना घडत असल्याने, संभाव्य धोका टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
खानापूर व बेळगाव तालुक्यात पावसाचा जोर कायम असून अनेक गावांमध्ये अद्यापही अंधाराचे साम्राज्य आहे. काही ठिकाणी मुख्य रस्त्यांवर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली असून जनजीवनावर याचा मोठा परिणाम झाला आहे. या बिकट परिस्थितीचा विचार करूनच प्रशासनाने तातडीने शाळा-महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, अत्यंत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी-नाले आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे, तसेच हवामान विभाग व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन केले आहे.