Ahilya Nagar: वसंतराव देशमुख व महायुतीच्या नेत्यांना सोडून माझ्यावरच गुन्हे दाखल होत आहेत. हा कुठला न्याय आहे. मला अटक करा पण आमच्या कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या, अशी मागणी डॉ. जयश्री थोरात यांनी केली.
धांदरफळ येथील डॉ. सुजय विखे यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करत शनिवारी तालुका पोलीस ठाण्यासमोर जमलेल्या 50 जणांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
हे गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी महिलांनी रविवारी (दि. 27) छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून मूकमोर्चा काढून शहर पोलिसांना निवेदन दिले. त्या वेळी डॉ. थोरात बोलत होत्या. महाराष्ट्रात मुलींची आणि बहिणींची अशी सुरक्षितता आहे का? असा सवालही त्यांनी विचारला.
महाराष्ट्रात महिलांचा सन्मान झाला पाहिजे. ही राज्याची परंपरा आहे. युती सरकार लाडक्या बहिणी म्हणून योजना राबवत आहेत. मात्र महाराष्ट्रातील मुली आणि बहिणी खरेच सुरक्षित आहेत का, खोटे गुन्हे दाखल करू नका. तातडीने खोटे गुन्हे मागे घ्या, असे झाले नाही तर मी येथून हलणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला होता.
दुर्गाताई तांबे या वेळी म्हणाल्या, की पोलीस स्टेशनसमोर सर्व जमलो होतो. मागणी कायदेशीर आणि शांततेच्या मार्गाने होती, अशा वेळेस गुन्हे दाखल होतात. येथे कायद्याचे राज्य शिल्लक आहे की नाही, हाच हा प्रश्न आहे. मणिपूर आणि बिहारसारखी महाराष्ट्राची स्थिती झाल्याची टीका त्यांनी केली.
याप्रसंगी महिलांनी संताप व्यक्त केला. खोटे गुन्हे मागे न घेतल्यास संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावागावांमध्ये तीव्र आंदोलन उभारले जाईल आणि याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा देण्यात आला.