Latest
राज्यातील खाते वाटपाचा तिढा सुटणार? अजित पवार, प्रफुल्ल पटेलांचे अमित शहांसोबत खलबत
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा फुटीर गट सहभागी झाल्यानंतर नवीन मंत्र्यांच्या खातेवाटपासंबंधी तिढा निर्माण झाला आहे. हा तिढा दोन दिवसात सुटेल,असे भाकीत सत्ताधाऱ्याकडून वर्तवली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी बुधवारी रात्री केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
सत्तेत सहभागी झाल्यानंतरची ही औपचारिक भेट असल्याचे पटेल यांच्याकडून सांगण्यात आले असले तरी अर्धा तास उभय नेत्यांची शहा यांच्या सोबत खलबत झाली.बैठकी दरम्यान अजित पवार यांनी अर्थ, सहकार आणि ग्रामविकास खात्यासाठी आग्रह धरल्याची चर्चा रंगली आहे.अशात या बैठकीत खाते वाटपा संबंधी अंतिम निर्णय झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.लवकरच राज्यात खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा होणार असल्याचे त्यामुळे बोलले जात आहे.
दरम्यान बैठकीनंतर पवार, पटेलांनी प्रतिक्रिया देणे टाळले. राज्यातील काही आमदारांचा अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते सोपण्यावर आक्षेप आहे.शिंदे गटातील काही नेत्यांनी मंत्रिमंडळात अद्याप संधी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. यातच खाते वाटपावर तिढा निर्माण झाल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. हा तिढा लवकरात लवकरच सुटावा आणि चांगले खाते पदरी पडावीत यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थेट दिल्ली गाठत शहासोबत खलबत केली.

