

या पिकाला कोरडे व थंड हवामान चांगले मानवते. कडक थंडीचा फळांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. खूप थंडी व कमी तापमानामुळे फळे वेडीवाकडी वाढतात. ढगाळ वातावरण व एकसारखा पडणारा पाऊस या पिकाला मानवत नाही. अशा वातावरणात कीड व रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो.
तापमान 30 अंश से.च्या वर गेल्यास फळधारणेवर विपरीत परिणाम होऊन उत्पादन कमी होते. साधारण 13 ते 21 अंश से. तापमान वांगी पिकाला चांगले मानवते.
वांग्याचे पीक वेगवेगळ्या जमिनीमध्ये येऊ शकते. पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम काळी, कसदार जमीन या पिकाला उत्तम असते. नदीकाठच्या गाळाच्या जमिनीत वांग्याचे भरपूर उत्पादन होते. 5.5 ते 6.0 सामू असलेल्या जमिनीत या पिकाची वाढ चांगली होते. दलदलीच्या जमिनीत हे पीक घेणे टाळावे. नदीकाठच्या गाळवट जमिनीत वांग्याचे उत्पादन भरपूर येते.
लागवड व हंगाम – वांग्याची लागवड वर्षभर करता येते. हेक्टरी 500 ग्रॅम बी सुधारित वाणासाठी पुरते तर संकरित वाणांचे 150 ग्रॅम बी पुरेसे होते.
रोपवाटिका व्यवस्थापन – 3 बाय 2 मीटर लांबीचे व रुंदीचे आणि 15 सेंमी उंचीचे गादीवाफे तयार करावेत. प्रतिवाफ्यात 2 पाट्या चांगले कुजलेले शेणखत आणि 200 ग्रॅम संयुक्त रासायनिक खते द्यावीत. मर रोगाचे नियंत्रणासाठी 30 ते 40 ग्रॅम ब्लॉयटाक्स टाकावे. वाफ्याच्या रुंदीस समांतर 10 सेंमी अंतरावर बोटाने 1 ते 2 सेंमी खोलीच्या ओळी काढून त्यात बी पातळ पेरावे.
रोपांच्या जोमदार वाढीसाठी उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी प्रत्येक वाफ्यास 50 ग्रॅम युरिया खत आणि 15 ते 20 ग्रॅम फोरेट, रोपाच्या दोन ओळीत टाकावे व हलके पाणी द्यावे. लागवडीपूर्वी रोपांना थंड पाण्याचा ताण द्यावा, म्हणजे रोप कणखर होईल.
लावगड करण्याअगोदर एक दिवस रोपांना पाणी द्यावे. लागवडीपूर्वी रोपांची मुळे इमिडॉक्लोप्रीड 1 मिली प्रति 1 लिटर पाणी या द्रावणात 3 तास बुडवून 90 बाय 75 सेंमीवर लावावी.
खत व पाणी व्यवस्थापन – जमीन तयार केल्यानंतर जमिनीत हेक्टरी 20 ते 25 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे. अधिक उत्पादनासाठी हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश ही रासायनिक खते द्यावीत. नत्राची अर्धी मात्रा तसेच स्फुरद व पालाशाची पूर्ण मात्रा रोपांचे स्थलांतर करण्यापूर्वी द्यावी.
नत्राची उर्वरित मात्रा एक महिन्याने द्यावी. रोपांना 7 ते 8 दिवसांच्या अंतराने तर उन्हाळ्यात 5 ते 6 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पावसाळ्यात आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास तणांच्या वाढीवर नियंत्रण राहून उत्पादनात भर पडते.
आंतरमशागत – पिकामध्ये नियमित खुरपणी, कोळपणी करून तणांचा बंदोबस्त करावा. झाडांना मातीची भर द्यावी. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते. पिकांच्या दोन ओळींमध्ये काळ्या पॉलिथीनचे आच्छादन केल्यास तणांवर नियंत्रण राहते.
काढणी व उत्पादन – फळे पूर्ण वाढून त्यांना आकर्षक रंग आल्यावर काढणी करावी. पार कोवळी फळे काढल्यास उत्पादनात घट येते आणि अशी फळे गिर्हाईकांना पसंत पडत नाहीत. त्यामुळे पूर्ण वाढलेली परंतु कोवळी, टवटवीत आणि चकचकीत असताना फळे काढावीत. फळांचे देठ धारदार चाकूने कापावेत. 4 ते 5 दिवसांच्या अंतराने 10 ते 12 वेेळा वांग्यांची तोडणी करता येते. फळांची प्रतवारी करून विक्रीस पाठवावीत. वांग्याचे सरासरी उत्पादन 40 ते 50 टनपर्यंत मिळते. पिकाचा कालावधी 180 ते 200 दिवस आहे.
– सत्यजित दुर्वेकर