

जिंतूर : उन्हाळ्याच्या हंगामात आंब्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असताना जिंतूर शहरात केमिकलयुक्त आंब्यांची सर्रास विक्री सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. नैसर्गिकरित्या पिकण्यास वेळ लागत असल्याने काही व्यापाऱ्यांकडून कृत्रिम रसायनांचा वापर करून आंबे लवकर पिकवले जात असल्याचा आरोप होत आहे. यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाजारात आकर्षक पिवळा रंग असलेले आंबे मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र बाहेरून पिकलेले दिसणारे अनेक आंबे आतून कच्चे किंवा चवीला फिके असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. तज्ज्ञांच्या मते, कॅल्शियम कार्बाइडसारख्या घातक रसायनांचा वापर करून फळे कृत्रिमरीत्या पिकविल्यास त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होऊ शकतो.
स्थानिक नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही बाजारपेठेत तपासणी मोहिमा दिसून येत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. उन्हाळ्यात आंब्यांची मागणी वाढत असल्याने काही व्यापारी अधिक नफा मिळविण्यासाठी नियम धाब्यावर बसवत असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रासायनिक पद्धतीने पिकविलेल्या फळांच्या सेवनामुळे पोटदुखी, उलट्या, मळमळ, डोकेदुखी यांसारखे त्रास उद्भवू शकतात. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना याचा अधिक धोका असतो. त्यामुळे फळे खरेदी करताना ग्राहकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
जिंतूर शहरातील विविध भागांतील फळ विक्रेत्यांकडे अचानक तपासणी मोहीम राबवून आंब्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच दोषी आढळणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना धडा शिकवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासन आणि संबंधित यंत्रणा याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, की नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ असाच सुरू राहणार, असा सवाल जिंतूरकरांकडून उपस्थित केला जात आहे. शहरातील ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने तपासणी मोहीम हाती घेण्याची गरज व्यक्त होत आहे.