

डॉ. एस. एन. पठाण
( नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि आळंदी येथील विश्वशांती केंद्राचे समन्वयक तसेच सल्लागार)
आपल्या देशात विविध जाती-धर्माव, विविध भाषा बोलणारे, विविध पेहराव, विविध चालीरीती, विविध खानपान पद्धती असणारे लोक राहतात, 'सर्वधर्मसमभाव' हा आपल्या लोकशाहीचा आत्मा असून, एवढी विविधता असून देखील भारत देश हा एकसंध आहे. कारण, लौकिकार्थाने शिक्षित नसलेले, विविध खेड्यापाड्यांत राहणारे गरीब, दीनदुबळे लोक आजही सहिष्णु आणि उदार आहेत, असेच म्हणावे लागेल, येथील जनता सहनशील, समंजस व सुसंस्कृत आहे, याचे कारणच भारतभूमी ही ऋषिमुनी, तपस्वी आणि संतसज्जनाची आहे. हे संत लोककवी-लोकनायक होते. ते योगी-उद्योगी आणि उदार-विचारी होते. त्यांनी समाजाला नीती आणि सदाचाराची शिकवण दिली. सामान्य माणूस त्यांच्या मागे चालत राहिला.
संतांनी समाजामधील भेदभावांची धार बोथट केली आणि म्हणूनच आपला हा गावगाडा सुसंस्कृत आणि समंजस राहू शकला. ज्ञानोबा-माउली-तुकाराम जयघोष मंत्रच या संतमंडळींत विविध जाती-धर्माचे स्त्री-पुरुष होते. विशेषतः महाराष्ट्रातील जनसामान्यांवर संत ज्ञानेश्वर माउली व संत तुकाराम महाराज या दोन संतांचा प्रचंड प्रभाव पडलेला दिसून येतो. "ज्ञानोबा-माउली-तुकाराम" हा महाराष्ट्रातील जनतेचा जणू जयघोष मंत्रच झाला आहे.
या मंत्राला जाती-धर्माची बंधने नाहीत किंवा उच्च-नीचतेचा संसर्ग नाही. महाराष्ट्रातील जनतेचा अंतरीचा आध्यात्मिक आवाज म्हणजेच "ज्ञानोबा- माउली-तुकाराम" आणि हाच जयघोष करीत तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माउली व जगदुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांनी आळंदी-देहूवरून हजारो वारकऱ्यांसह प्रस्थान केले आहे व या पालख्या, हे वारकरी विठ्ठलभेटीसाठी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. पुण्यातील नागरिकांनी या पालख्यांचे आणि लाखो वारकऱ्यांचे 9 जुलैला भव्य स्वागत केले.
संतांनी भेदाभेदाचा आग्रह मोडून काढला
११ व्या शतकात भक्त पुंडलिकाने बहुजन समाजाच्या पारलौकिक कल्याणासाठी कानड्या-सावळ्या एकेश्वर विठ्ठलाची पंढरपुरी भूवैकुंठात चंद्रभागेच्या वाळवंटी स्थापना केली. चातुर्वर्ण्य व्यवस्थेला जोरदार शह देत संतांची वारकरी परंपरा महाराष्ट्राच्या भूमीत भक्कमपणे रुजली. 'नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।' ही आद्य कीर्तनकार नामदेवांची प्रतिज्ञा संतांनी पूर्णत्वास नेली. सावता माळ्याने, 'कांदा मुळा भाजी अवधी विठाबाई माझी॥' असे म्हणत अवघे मानवी जीवन संतकाव्यात मांडले. 'ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा। काय भुललासी वरलिया रंगा।।' असे म्हणतच, चोखोबांनी आपले अंतरंग मांडले. 'आम्ही वारीक वारीक | करू हजामत बारीक ॥' असे म्हणत संत सेना न्हावी यांनी काव्य केले. संत एकनाथ, संत शेख महंमद, संत मुंतोजी, संत वजीर उल्मुल्क आणि संत हुसेन अंबर यांनीही भेदाभेदाचा आग्रह मोडून काढला. अशा या विविध संतांचा विचार घेऊन विठ्ठल भेटीसाठी हे सर्व वारकरी पदयात्रेने पंढरपूरला निघाले आहेत.
तुकाराम महाराज : महाराष्ट्राचे धर्मगुरू
त्या काळात जाती-धर्माच्या नावाखाली समाज पार दुभंगून गेला होता. धर्ममार्तंड आणि पुरोहितांचा समाजावर फार मोठा पगडा होता. संत तुकारामांच्या काळात सतराव्या शतकात मात्र संतांच्या सामाजिक समतेच्या आणि ज्ञानप्राप्तीच्या जनआंदोलनाला एक मोठे क्रांतिकारक परिमाण मिळाले. शुद्रातिशूद्र वर्णाच्या संतांनी उच्चवर्णीयांचे अधिकारक्षेत्र असलेल्या धार्मिक व्यवस्थेत हस्तक्षेप केला. कर्मकांडवादी धर्मव्यवस्थेविरोधात विद्रोह पुकारला. वर्णश्रेष्ठत्ववादी कर्मठ आणि धर्माध व्यवस्थेला सतराव्या शतकात सुरुंग लावण्याचे महनीय कार्य संत तुकारामांनी केले. जनसामान्यांच्या धार्मिक आणि सामाजिक अस्तित्वासाठी संत तुकारामांनी प्रखर संघर्ष केला. लोकजागृतीचे विवेकवादी आणि विज्ञाननिष्ठ असे जनआंदोलन चालविले आणि त्यावर तुकोबांनी कळस चढविला, एक सामान्य शेतकरी, एक सामान्य वाणी, एक सामान्य कुणबी काम करणारा माणूस महाराष्ट्राचा धर्मगुरू बनला. संत उच्चवर्णीयांविरुद्ध नव्हते तर ते धर्माचा व्यापार करणाऱ्या उच्चवर्णीय व्यवस्थेविरोधात जनआंदोलन चालविणारे युगपुरुष होते.