Ashadhi Wari: विठुनामाच्या गजराने दुमदुमली ‘श्रीरामनगरी’; फलटणमध्ये विसावला माऊलींचा सोहळा

घुमला हरिनामाचा गजर
Ashadhi Wari: विठुनामाच्या गजराने दुमदुमली ‘श्रीरामनगरी’; फलटणमध्ये विसावला माऊलींचा सोहळा
Published on
Updated on
पोपट मिंड

फलटण : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा शुक्रवारी सायंकाळी फलटणनगरीत दाखल होताच संपूर्ण शहर विठ्ठलनामाच्या अखंड गजराने, टाळ-मृदंगांच्या निनादाने आणि भगव्या पताकांच्या लहरींनी भक्तिरसात न्हाऊन निघाले. ‘ज्ञानोबा-तुकाराम... माऊली... माऊली...’च्या जयघोषात लाखो वैष्णवांचा मेळा फलटण विमानतळावरील पालखीतळावर मुक्कामासाठी विसावला आणि अवघी श्रीरामनगरी माऊलीमय झाली.

तुकाराम महाराजांच्या ‘पंढरीस जाऊ, रखुमादेवीवरा पाहू...’ या अभंगातील भावार्थ प्रत्यक्ष अनुभवत पांडुरंगाच्या दर्शनाची आस मनात बाळगून निघालेल्या वारकऱ्यांचे फलटणकरांनी भक्तिभावाने स्वागत केले. तरडगाव येथून सकाळी प्रस्थान केलेल्या पालखी सोहळ्याने सुरवडी येथे न्याहारी, निंभोरे येथे भोजन आणि वडजल येथे विसावा घेत सायंकाळी फलटण शहरात प्रवेश केला. शहराच्या प्रवेशद्वारापासूनच स्वागत कमानी, आकर्षक रांगोळ्या, फुलांची उधळण आणि हरिनामाच्या जयघोषाने वातावरण भारावून गेले होते.

जिंती नाका येथे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर, मुख्याधिकारी निखिल जाधव, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी धन्यकुमार गोडसे, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, गटविकास अधिकारी घावटे यांच्यासह विविध मान्यवरांनी माऊलींचे स्वागत केले. त्यानंतर सद्‌गुरू हरिभाऊ मंदिर, पाचबत्ती चौक, ऐतिहासिक श्रीराम मंदिर, गजानन चौक, महात्मा फुले चौक आणि गिरवी नाकामार्गे पालखी विमानतळावरील पालखीतळावर दाखल झाली. श्रीराम मंदिराजवळ नाईक-निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर व राजघराण्यातील सदस्यांसह मान्यवरांनी पारंपरिक पद्धतीने माऊलींचे स्वागत केले.

पालखीतळावर लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत समाजआरती भक्तिमय वातावरणात पार पडली. समाजआरतीनंतर माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या. माऊलींचा मुक्काम एकाच दिवसाचा असल्याने फलटण शहर, तालुका आणि परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. ऐतिहासिक श्रीराम मंदिर आणि जबरेश्वर मंदिरातही दिवसभर दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news