Ashadhi Wari 2023 : गोव्यातील विठ्ठल भक्त पंढपुरात दाखल! महिलांसह हजारोंच्या संख्येने वारकऱ्यांचा समावेश

Ashadhi Wari 2023 : गोव्यातील विठ्ठल भक्त पंढपुरात दाखल! महिलांसह हजारोंच्या संख्येने वारकऱ्यांचा समावेश
Published on
Updated on

पणजी; गायत्री हळर्णकर : एकादशी म्हटले की विठ्ठलभक्तांचे पाय आपोआपच पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाकडे वळू लागतात. पांडुरंगाच्या दर्शनासाठी आसुसलेले हे भक्त कधी बसने तर कधी पायी वारी करून विठुरायाचे दर्शन घेतात. दरवर्षी वारीला जाणारे गोव्यातही अनेक भक्त आहेत. बदलत्या काळानुसार वारीचे स्वरूप बदलले असले तरीही वारीची प्राचीन परंपरा आजही गोव्यातील अनेकांनी जपलेली आहे. अगदी सरकारी नोकरदार असलेलेही गोव्यातील अनेक जण सुट्टी टाकून दरवर्षी आषाढी तसेच कार्तिकी एकादशीच्या वारीमध्ये सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे.

गोव्यातील हजारो वारकरी गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी न चुकता आषाढी किंवा कार्तिकी वारीला पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेत असतात. गेल्या अनेक पिढ्यांपासून वारी करणारी जी कुटुंबे गोव्यात आहेत, त्यांच्या पुढील पिढ्यांकडून अजूनही दरवर्षी वारी केले जाते. वर्षभर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या आठवणीत रमलेले राज्यातील अनेक वारकरी वारी येताच पंढरपूरकडे रवाना होतात आणि आपल्या लाडक्या देवाचे दर्शन घेऊन तृप्त होतात. अनेक भागांतील वारकरी आषाढी तसेच कार्तिकी महिन्यातील वारी पायी चालून पूर्ण करतात. गोवा ते पंढरपूर मार्ग पायी चालत असताना या वारकर्‍यांसमोर अनेक समस्या येतात. आषाढी वारी पावसाळ्यात येत असल्याने तर अनेक प्रश्न समोर येत असतात. पण कशाचीही पर्वा न करता गोव्यातील अनेक वारकर्‍यांनी पायी वारीची परंपरा कायम ठेवलेली आहे.

यंदा माशेल येथील एका वारकर्‍याचा पायी जात असताना मृत्यू झाला. यापूर्वीही पायी वारी करीत असताना गोव्यातील अनेक वारकर्‍यांना विविध शारीरिक समस्यांचा सामना करावा लागलेला आहे. पण कितीही त्रास होवो, वारी करणे त्यांनी अजूनही थांबवलेले नाही.

दरम्यान , दैनिक पुढारीने अशाच एका दाम्पत्याची दखल घेतली, जे सरकारी नोकरीत सेवा बजावत आहे. बाणास्तारी येथील सागर फडते हे सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये तर त्यांची पत्नी मृणाली फडते सरकारी शाळेत नोकरी करतात. ते गेली कित्येक वर्षे न चुकता सुट्टी टाकून पायी वारी करतात. यंदा त्यांनी 14 जून रोजी मुळगाव येथून पायी वारीला सुरुवात केली होती. 13 दिवसांची पायी वारी करीत 26 जून रोजी ते पंढरपूरला पोहोचले. त्यांच्या मते आपले पारंपरिक सण, संस्कृती यांचे जतन करणे आमच्याच हाथी आहे. आज या वारीला जाताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पुरुषांना तरी कमी मात्र महिला वर्गाला जास्त त्रास असतात. असं असलं तरी या वारीत महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो. माऊली वारकरी मंडळ मुळगाव अंतर्गत दरवर्षी ते वारीला जातात या मंडळात सुद्धा 60 टक्के महिलांचा सहभाग असतो, अशी माहिती फडते दांपत्याने दिली आहे.

आरोग्य जपत उपवास करा

आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास करण्याची परंपरा आहे. आज बदलत्या जीवनशैली बरोबर अनेक आजार उद्भवत आहेत. ज्यासाठी योग्य आहार आणि वेळोवेळी खाणे आवश्यक आहे. तसेच महिलांमध्ये अशक्तपणा, अनेमियाचा धोखा वाढत असून, दर दोन दोन तासांत काही तरी खाणे अपेक्षित असते. आज जास्त स्त्रिया घर सांभाळत नोकरीही करत असल्याने धाकधूक वाढलेली आहे. त्यामुळे एक आहारतज्ज्ञ म्हणून मी तरी हेच म्हणेन की कुणाला झेपत त्यांनी हा उपवास करावाच. मात्र आरोग्य जपत आणि श्रद्धा मनात ठेवत परंपरा जपण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन आहारतज्ज्ञ मेघना देसाई यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news