

वॉशिंग्टन ः 'नासा'च्या 'हबल' या अंतराळ दुर्बिणीने एका गोलाकार क्लस्टरचे (तारकापुंज) छायाचित्र टिपले आहे. या क्लस्टरमध्ये हजारो तारे झगमगत असताना दिसून येतात. हा तार्यांचा समूह गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळे एकमेकांशी बांधला गेलेला आहे.
'नासा'ने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये म्हटले आहे की 'तुम्हाला एकत्र ठेवणारी गुरुत्वाकर्षण हीच एक चीज आहे का? तसे असेल तर तुम्ही एक गोलाकार क्लस्टर असू शकता!' या छायाचित्राला 'नासा'ने ट्विटही केले आहे. 'हबल'ने ज्या क्लस्टरचे छायाचित्र टिपले आहे ते कॉन्स्टिलेशन सॅजिटेरियसमध्ये आहे. अशा प्रकारच्या गोलाकार क्लस्टरमध्ये अनेक तारे असू शकतात. त्यापैकी काही तारे आपल्या ब—ह्मांडाइतकेच जुने असू शकतात. सध्या 'नासा'ची आणखी एक नवी अंतराळ दुर्बिण जेम्स वेब ही अशा तार्यांचे सखोल निरीक्षण करीत आहे. या छायाचित्रात दिसणार्या हजारो तार्यांपैकी प्रत्येकाचा आकार व तापमान वेगवेगळा आहे. 'हबल' दुर्बीण गेल्या तीस वर्षांपासून अंतराळात आपले काम करीत असून तिने अशी अनेक छायाचित्रे टिपलेली आहेत.