

लंडन : आपण ‘माझे शरीर’ म्हणत असलो तरी आपल्या शरीराची आपल्यालाच पुरती ओळख नसते. सर्वसामान्यांचे सोडाच; पण संशोधकांपासूनही मानवी शरीरातील अनेक गोष्टी दडलेल्या राहू शकतात. काही वर्षांपूर्वीच आयर्लंडच्या वैज्ञानिकांनी मानवी शरीरात एका नवीन अवयवाचा शोध लावला होता, जो आतापर्यंत कुणाच्या निदर्शनास आला नव्हता. त्यामुळे गेली शंभर वर्षे शिकवले गेलेले शरीरशास्त्र अचूक नव्हते, हे स्पष्ट झाले.
या नव्या संशोधनामुळे पोट व पचनसंस्थेच्या विकारांवर उपचार करणे सोपे होणार आहे. आतडे व पोट यांना जोडणारी जी आंत्रपेशी असते, ती वेगवेगळ्या भागांची बनलेली असते, असे आतापर्यंत मानले जात होते; पण आयर्लंडच्या लिमरिक विद्यापीठाचे शल्यशास्त्र प्राध्यापक जे. काविन कॉफी यांनी हा एकच अखंड अवयव असल्याचे सांगितले. ‘द लँसेट गॅस्ट्रोइन्ट्रोलॉजी अँड हेपॅटॉलॉजी’ या नियतकालिकात याबाबतचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला. त्यात आंत्रपेशी हा संपूर्ण अवयव असल्याचे म्हटले आहे. या शोधनिबंधाचे कठोर परीक्षण करण्यात आले असून, त्यात तो एकच अवयव असल्याचे मान्य करण्यात आले.