पेंग्विन बदलतात आपला आवाज!

पेंग्विन बदलतात आपला आवाज!

लंडन ः माणसावर अनेक गोष्टींचा कळत-नकळतपणे प्रभाव पडत असतो व त्याचे वर्तन त्याप्रमाणे होत असते. आपल्या मित्र-मैत्रिणींसारखे बोलणे, वागणे असे वर्तन अनेक मुला-मुलींकडून होते. हे केवळ माणसाबाबतच घडते असे नाही. पेंग्विनसारख्या समूहात राहणार्‍या पक्ष्यांमध्येही असेच वर्तन घडते. आपल्या साथीदारांसारखा आवाज काढण्यासाठी पेंग्विनही आपल्या आवाजात अनुकूल बदल करतात असे दिसून आले आहे.

एखादी व्यक्ती फ्रान्समध्ये राहून आली असेल तर तिच्या बोलण्यात फे्ंरच उच्चारांची लकब असते. कुणी टेक्सासमधून आला असेल तर त्याच्या बोलण्यात अमेरिकन उच्चारांचा 'लहेजा' दिसतो. अनेक वेळा हॉस्टेलमध्ये राहून आलेल्या मुला-मुलींचे बोलणे कुटुंबीयांच्या बोलण्यापेक्षा वेगळे असते. ही मुले आपल्या मित्रांसारखे बोलण्याचा प्रयत्न करतात असे नाही तर त्यांच्याबरोबर सातत्याने बोलत असल्याने त्यांची बोलण्याची शैलीही तशीच होऊन जाते. ट्युरिन विद्यापीठाच्या एका नव्या संशोधनात असे दिसून आले की पेंग्विनबाबतही असेच घडते. पशुपक्ष्यांच्या दुनियेतही असे घडते, आवाज बदलला जातो हे संशोधकांना कुतुहलजनक वाटत आहे. सामाजिक अनुकूलनाच्या रूपात होणार्‍या अशा घटना जरी मानवाबाबत सामान्यच असल्या तरी पशुपक्ष्यांमध्येही तसे घडण्याची अपेक्षा कुणी केली नव्हती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news