वॉशिंग्टन : ताणतणाव व तत्संबंधी कार्टिसोल हार्मोन याविषयी अनेकांना माहिती असेल. आरोग्याला हे हानिकारक ठरते याची आपल्याला कल्पना आहे. मात्र, काही प्रमाणातील तणाव हा मेंदूसाठी लाभदायकच ठरतो. एका नवीन संशोधनातून याबाबतची पुष्टी झाली आहे. कमी ते मध्यम पातळीचा ताण मानसिक आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतो असे या संशोधनातून आढळून आले आहे.
'न्यूरो सायन्स न्यूज'मध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. जॉर्जिया विद्यापीठाच्या युवा विकास संस्थेतील संशोधकांनी याबाबतचे नवे संशोधन केले. त्यानुसार लहान मुदतीचा ताण व्यक्तीच्या मेंदूसाठी लाभदायक ठरतो.
जरी तुमचे डोके जड वाटत असेल किंवा तणावामुळे तुम्हाला थकवा जाणवत असेल, तरी असा ताण मेंदूसाठी चांगलाच ठरतो. मात्र, अतिरिक्त ताण मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतो, असेही आढळून आले आहे. कमी किंवा किंचित जास्त तणावामुळे मानसिक लवचिकता वाढते आणि मनोविकार होण्याचा धोका कमी होतो. उदासीनता आणि समाजविरोधी वर्तन यासारख्या समस्या कमी करण्यातही हे मदत करू शकते. कौशल्य विकास तसेच वैयक्तिक विकासातही यामुळे प्रभावी सुधारणा होते. परीक्षेच्या वेळी येणारा ताण किंवा ऑफिसमध्ये एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगआधी येणारा ताण असाच असतो.