देव तारी त्‍याला कोण मारी ; चार मगरीच्या हल्‍ल्‍यातून बचावला मच्छीमार !

चार-चार मगरींनी हल्‍ला करूनही बचावला!
चार-चार मगरींनी हल्‍ला करूनही बचावला!

हरेरे ः मगरीच्या जबड्यात अडकल्यावर सुखरूप सुटका होणे कठीणच. अशा चार मगरींनी एकाच वेळी हल्‍ला केला तर? या गोष्टीची कल्पनाही करणे आपल्यासाठी कठीण आहे. मात्र, झिम्बाब्वेमध्ये अशा हल्ल्यात एक मच्छीमार जीवानिशी बचावला! झिम्बाब्वेमधील करिबामध्ये अलेक्झांडर चिमेझ्झा नावाच्या या मच्छीमाराला पाण्यात चार मगरींनी घेरले व हल्‍ला केला. मात्र, त्याने या चारही मगरींशी दोन हात केले आणि त्यांच्या तावडीतून सुटका करून घेण्यात यश मिळवले. हा मच्छीमार आपल्या काही साथीदारांसह मासे पकडण्यासाठी नदीवर गेला असता ही घटना घडली.

तो नदीत उतरताच तिथे दबा धरून बसलेल्या मगरींनी त्याच्यावर हल्‍ला केला. एका मगरीने आधी त्याचा हात आपल्या जबड्यात धरून त्याला पाण्यात आपटले. त्यानंतर दुसरी मगर आली व तिने त्याला धरून गरगर फिरवले. मात्र, तरीही धीर न सोडता अलेक्झांडरने या मगरींचा सामना केला. या मगरी कमी होत्या म्हणून की काय आणखी दोन मगरी तिथे आल्या. अशा वेळीही त्याने धीराने आपला जीव वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवला. त्याच्या साथीदारांनीही मगरींवर दगडफेक करून त्याला मदत केली. अखेर या मगरी थकल्या आणि त्यांनी त्याला सोडून दिले. ही संधी साधून तो पाण्यातून बाहेर आला. मात्र, त्याला बर्‍याच गंभीर जखमा झाल्या असून त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news