

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमधील शास्त्रज्ञांनी एका अत्यंत दुर्मीळ वृक्ष प्रजातीला ‘झोम्बी’ असे अनोखे नाव दिले आहे. हे झाड जिवंत असूनही नैसर्गिकरीत्या वाढण्यास किंवा पुनरुत्पादन करण्यास असमर्थ असल्याने वैज्ञानिकांनी ही भीती व्यक्त केली आहे. ‘मर्टल रस्ट’ (Myrtle Rust) नावाच्या एका घातक बुरशीजन्य रोगामुळे या प्रजातीचा अंत जवळ आल्याचे सांगण्यात येत आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँडमधील वनस्पतिशास्त्रज्ञ प्राध्यापक रॉड फेनशॅम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रजातीचे शास्त्रीय नाव ‘रोडॅम्निया झोम्बी’ (Rhodamnia zombi) असे आहे. जेव्हा 2020 मध्ये पहिल्यांदा या प्रजातीचे मूल्यांकन झाले, तेव्हा तिला नावही नव्हते. तेव्हापासून आतापर्यंत यातील 10 टक्के झाडे नष्ट झाली आहेत. उरलेल्या एकाही झाडाला या बुरशीमुळे फुले किंवा फळे येत नाहीत, ज्यामुळे त्यांची नवीन पिढी तयार होणे थांबले आहे. हे झाड मध्यम आकाराचे असून, याची पाने गडद हिरवी आणि फुले पांढरी असतात. मात्र, गडद पिवळ्या रंगाची ही बुरशी झाडाच्या कोवळ्या कोंबांवर वारंवार हल्ला करते.
यामुळे झाडाची वाढ खुंटते आणि कालांतराने झाड सुकून मरते. ऑस्ट्रेलियात 2010 मध्ये पहिल्यांदा हा रोग आढळला होता. प्राध्यापक फेनशॅम यांच्या मते, ही प्रजाती आता ‘अतिशय संकटग्रस्त’ श्रेणीत आली आहे. ‘जर वेळीच हस्तक्षेप केला नाही, तर ‘कॅटेगरी एक्स’ या यादीतील 17 प्रजाती एका पिढीच्या आत पृथ्वीवरून नष्ट होतील,’ असा इशारा त्यांनी दिला आहे. यातील एकाही झाडामध्ये या रोगाशी लढण्याची प्रतिकारशक्ती अद्याप दिसून आलेली नाही. परिस्थिती गंभीर असली, तरी शास्त्रज्ञांनी हार मानलेली नाही.
‘रोडॅम्निया’ समूहातील इतर काही प्रजातींमध्ये या रोगाशी लढण्याची प्रतिकारशक्ती आढळली आहे. शास्त्रज्ञ आता जंगलातून या झाडाच्या अशा फांद्या शोधत आहेत, ज्यांना अद्याप रोगाची लागण झालेली नाही. या फांद्यांपासून लिस्मोर आणि टाऊन्सविले येथील तज्ज्ञ रोपवाटिकांमध्ये नवीन रोपे तयार करत आहेत. ही रोपे सध्या सुरक्षित असली, तरी त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावे लागत आहे.