

वॉशिंग्टन : अमेरिकेत सध्या एका विचित्र आणि भीतीदायक घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. येथे एक ‘झोम्बी’ विषाणू वेगाने पसरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे, जो कोळ्यांना आपले शिकार बनवत आहे. वास्तविक पाहता हा विषाणू नसून एक प्रकारची बुरशी (Fungus) आहे. ही बुरशी कोळ्यांच्या मेंदूवर नियंत्रण मिळवून त्यांना अक्षरशः ‘झोम्बी’ बनवत आहे. या घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण असले, तरी शास्त्रज्ञांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
अमेरिकेत आढळणारी ही एक विशिष्ट प्रकारची बुरशी आहे, जिचे शास्त्रीय नाव गिबेल्युला अॅटनबरोई (Gibellula attenboroughii) आहे. ही बुरशी केवळ कोळ्यांनाच संक्रमित करते. एकदा का कोळ्याच्या शरीरात या बुरशीचा शिरकाव झाला की, ती त्याच्या संपूर्ण मज्जासंस्थेवर आणि मेंदूवर ताबा मिळवते. ही बुरशी कोळ्याच्या शरीरात पसरून त्याच्या हालचालींवर नियंत्रण मिळवते. ती कोळ्याला त्याचे जाळे सोडून इतर ठिकाणी भटकण्यास भाग पाडते. त्यानंतर, बुरशी हळूहळू कोळ्याच्या शरीरात विषारी द्रव्ये सोडून त्याला आतून मारून टाकते.
कोळ्याच्या मृत्यूनंतर, त्याच्या शरीरावर विचित्र फांद्यांसारखी रचना वाढू लागते. यामधून नवीन बीजाणू (spores) हवेत पसरतात आणि इतर कोळ्यांना संक्रमित करतात. अमेरिकेतील घरांच्या पोटमाळ्यावर अशा पांढर्या रंगाच्या मृत ‘झोम्बी’ कोळ्यांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे. कोळ्यांना ‘झोम्बी’ बनवणार्या या बुरशीमुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. प्रसिद्ध टीव्ही शो ‘द लास्ट ऑफ अस’ मध्ये ज्याप्रमाणे एक बुरशी मानवांना झोम्बी बनवते, तसाच काहीसा प्रकार आपल्यासोबतही घडू शकतो, अशी भीती अनेकांना वाटत आहे. मात्र, शास्त्रज्ञांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
डेन्मार्कच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे मायकोलॉजिस्ट (बुरशी शास्त्रज्ञ) जोआओ अराऊजो यांनी सांगितले की, गिबेल्युला अॅटनबरोई ही बुरशी अत्यंत विशिष्ट आहे आणि ती केवळ कोळ्यांच्या प्रजातींनाच संक्रमित करू शकते. तिच्या रचनेमुळे ती मानवी शरीरात वाढू शकत नाही किंवा कोणताही धोका निर्माण करू शकत नाही. त्यामुळे मानवांनी घाबरण्याचे अजिबात कारण नाही. यापूर्वीही प्राण्यांच्या जगात ‘फँ्रकेन्स्टाईन ससे’ किंवा ‘झोम्बी खारी’ यांसारख्या विचित्र घटना समोर आल्या आहेत. कोळ्यांना ‘झोम्बी’ बनवणारी ही घटना निसर्गातील एक भयावह परंतु तितकीच आश्चर्यकारक प्रक्रिया आहे. शास्त्रज्ञांच्या मते, मानवाला यापासून कोणताही धोका नसला, तरी कीटकांच्या जगात घडणारी ही उलथापालथ निश्चितच संशोधनाचा एक महत्त्वाचा विषय आहे.