वॉशिंग्टन : आहारामध्ये काही खनिजांचेही योग्य प्रमाण असणे आवश्यक असते. त्यामध्येच झिंक किंवा जस्ताचा समावेश आहे. आबालवृद्धांमधील रोगप्रतिकारक क्षमतेसाठी झिंक अत्यंत गरजेचे असते. जर या खनिजाचे शरीरातील प्रमाण कमी असेल तर रोगप्रतिकारक क्षमतेवर तसेच हाडांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. सध्याच्या कोरोना काळात याबाबत गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
आपले शरीर स्वतःच झिंकची निर्मिती करू शकत नाही. त्यामुळे आहारातूनच या खनिजाचे सेवन करावे लागते किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याच्या सप्लिमेंटस् घ्याव्या लागतात. लहान मुलांमध्ये बर्याच वेळा जुलाबाची समस्या दिसून येते. अशावेळी त्यांना झिंकचा आहार देण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटना देते. काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनचा एक संशोधन अहवाल प्रसिद्ध झाला होता. त्यामध्ये म्हटले होते की झिंकमुळे त्वचेच्या डागडुजीपासून संक्रमण रोखण्यापर्यंत अनेक कार्यांमध्ये महत्त्वाचे योगदान असते. जखम भरून निघण्यासाठीही झिंक आवश्यक असते. तसेच मेटाबॉलिक सिंड्रोम रोखण्यासाठीही ते उपयुक्त आहे. या सिंड्रोममुळे हृदयविकार, मधुमेह, स्ट्रोकचा धोका वाढतो. ऑस्टियोपोरोसिस या आजारात हाडे कमजोर होतात. हा आजार टाळण्यासाठीही झिंक उपयुक्त आहे. दूध, दही, पनीर, मशरूम, कोबी, फ्लॉवर, भोपळ्याच्या बिया, लसूण, तीळ, मटार, गहू, सुका मेवा, सोयाबीन आणि डाळींमध्ये झिंकचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे असा आहार घेणे आरोग्यासाठी लाभदायक ठरते.