

लंडन : लंडनमधील अवघ्या 24 वर्षांच्या आंद्रे यारहॅम या तरुणाचा डिमेन्शिया (स्मृतिभ्रंश) या आजाराने मृत्यू झाला. मात्र, या दुःखातही त्याच्या कुटुंबीयांनी आंद्रेचा मेंदू त्यांनी वैद्यकीय संशोधनासाठी दान केला असून, या माध्यमातून भविष्यात या आजारावर उपचार शोधण्यास मदत होणार आहे.
आंद्रेच्या आजाराची सुरुवात तो 23 वर्षांचा होण्यापूर्वीच झाली होती. तो गोष्टी विसरू लागला होता आणि विचित्र वागू लागला होता. चाचण्यांनंतर त्याला अर्ली-ऑनसेट फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी त्याच्या मेंदूचे स्कॅन पाहिले असता, तो एखाद्या 70 वर्षांच्या वृद्धाच्या मेंदू सारखा दिसत होता. हा आजार इतका वेगाने पसरला की आंद्रेची बोलण्याची आणि हालचाल करण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट झाली. 27 डिसेंबर रोजी एका संसर्गामुळे त्याची प्रकृती खालावली आणि त्याचे निधन झाले. आंद्रेचा मेंदू केंब्रिजमधील अॅडनब्रुक हॉस्पिटलमध्ये संशोधनासाठी पाठवण्यात आला आहे. आंद्रेच्या मेंदूच्या अभ्यासातून डिमेन्शियाचे गुपित उलगडण्यास मदत होऊ शकते.