डिप्रेशन, चिंता आणि थकवा यामागे असू शकतो तुमचा आहार!

स्टॅनफोर्ड व हार्वर्ड तज्ज्ञांचा इशारा
डिप्रेशन, चिंता आणि थकवा यामागे असू शकतो तुमचा आहार!
File Photo
Published on
Updated on

न्यूयॉर्क : मन हे अन्नमय आहे असे आपल्याकडे प्राचीन काळापासूनच सांगितले जात आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये त्याची सविस्तर चर्चा दिसून येते. तुमचा आहार हा तुमच्या मनःस्थितीला कारणीभूत ठरू शकतो. सध्याच्या काळात याकडे बरेचसे दुर्लक्ष होत आहे व त्याचे दुष्परिणामही पाहायला मिळत आहेत. आता स्टॅनफोर्ड व हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी याबाबत इशारा दिला आहे. डिप्रेशन, चिंता व मानसिक थकवा यामागे तुमचा विचित्र आहार असू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.

आपल्यापैकी प्रत्येकाजवळ काही ना काही ‘कम्फर्ट फूडस्’ असतात, जी वेळ आली की जीभ व पोटाला दिलासा देतात. पण हे अन्न केवळ चव भागवतंय का? की आपल्या मानसिक आरोग्यावरही खोल परिणाम करतंय? स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे न्यूरोबायोलॉजीचे प्राध्यापक अँर्ड्यू ह्यूबरमॅन यांनी 4 एप्रिलच्या त्यांच्या पॉडकास्टमध्ये हार्वर्डचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ख्रिस पामर यांच्याशी बोलताना हा महत्त्वाचा विषय उलगडला, आपला आहार मानसिक आरोग्यावर कसा परिणाम करतो? इंस्टाग्रामवर त्यांच्या संभाषणाचा एक व्हिडीओ शेअर करताना ह्यूबरमॅन यांनी लिहिले, ‘आपण काय खातो याचा आपल्या मूड व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, हे आता सिद्ध होत चाललंय. विशेषतः अति-प्रक्रियायुक्त अन्न आणि मानसिक आजार यांच्यातला संबंध आता वैज्ञानिकद़ृष्ट्या स्पष्ट होत आहे.’ त्यांनी असंही नमूद केले की, मायटोकॉन्ड्रिया या पेशीतील ऊर्जा केंद्रांमध्ये होणारे बदल हे दोन्ही घटक जोडणारा एक दुवा असू शकतात. ह्यूबरमॅन म्हणाले, ‘अशा अनेक अभ्यासांमध्ये दिसून आलं आहे की जास्तीत जास्त नैसर्गिक, कमी प्रक्रिया केलेलं अन्न खाल्ल्यास मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.’ तरी हे निष्कर्ष सहसंबंध स्वरूपाचे आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. म्हणजेच, इतर जीवनशैलीचे घटकही या परिणामांना कारणीभूत ठरू शकतात.

संभाषणादरम्यान डॉ. ख्रिस पामर यांनी एक मोठा शोध सांगितला : ‘जितकं अधिक अति-प्रक्रियायुक्त अन्न खाल्लं जातं, तितकंच मानसिक व शारीरिक आरोग्य बिघडतं. हृदयरोग, लठ्ठपणा, मधुमेह, कर्करोग आणि मानसिक आजार, सर्वच बाबतींत धोका वाढतो.’ त्यांनी सांगितले की, 3 लाखांहून अधिक लोकांवर झालेल्या एका अभ्यासात ‘अति-प्रक्रियायुक्त अन्न खाणं आणि मानसिक आरोग्य यांच्यात थेट व सरळ संबंध’ आढळून आला. दररोज अशा अन्नाचा अनेक वेळा सेवन करणार्‍यांपैकी 58 टक्के लोकांनी मानसिक आरोग्य बिघडल्याची तक्रार केली. तर हे अन्न क्वचितच किंवा कधीच न खाणार्‍यांमध्ये हा आकडा फक्त 18 टक्के होता. आधुनिक आहारशैली, विशेषतः फास्ट फूड व पॅकबंद अन्नावरचा वाढता अवलंब, मानसिक अस्वस्थतेचा एक मोठा कारणभूत घटक ठरू शकतो, असा इशारा या तज्ज्ञांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news