Colourful Tomatoes | ब्रिटनमध्ये पिवळ्या, जांभळ्या, तपकिरी टोमॅटोची धूम

Colourful Tomatoes |
Colourful Tomatoes | ब्रिटनमध्ये पिवळ्या, जांभळ्या, तपकिरी टोमॅटोची धूम
Published on
Updated on

लंडन : ब्रिटनमध्ये दरवर्षी १ अब्ज पाऊंडपेक्षा (सुमारे १०,००० कोटी रुपये) जास्त उलाढाल असणाऱ्या टोमॅटोच्या बाजारपेठेत सध्या ग्राहकांच्या आवडीनिवडींमध्ये एक रंजक आणि रंगीबेरंगी बदल पाहायला मिळत आहे. वर्षानुवर्षे ब्रिटिश सॅलड आणि सँडविचवर अधिराज्य गाजवणाऱ्या पारंपरिक 'गोल लाल टोमॅटो'ची लोकप्रियता आता कमी होत असून, त्याची जागा सप्तरंगी आणि प्रीमियम 'चेरी ऑन द वाइन' टोमॅटो घेत आहेत.

रंगीबेरंगी टोमॅटोंची वाढती क्रेझ

‘इव्हशम व्हेल ग्रोअर्स'च्या आकडेवारीनुसार, या वर्षी ‘लाल नसलेल्या' म्हणजेच पिवळ्या, नारंगी, हिरव्या, जांभळ्या, तपकिरी आणि पट्टेरी टोमॅटोच्या विक्रीत तब्बल २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पूर्वीच्या काळी अशा रंगीबेरंगी जाती केवळ दिसायला चांगल्या असायच्या; मात्र त्यांची चव फारशी चांगली नसायची. परंतु, आता नवीन बियाण्यांमुळे हे टोमॅटो दिसायला सुंदर असण्यासोबतच चवीलाही अत्यंत उत्कृष्ट आणि चवदार झाले आहेत. यामुळे ग्राहकांना टोमॅटो म्हणजे केवळ 'लाल रंग' नव्हे, रंगबेरंगी टोमॅटोची आता सवय झाली आहे. उत्पादकांनीही आता आपल्या लागवडीचा २० टक्‍के भाग केवळ 'नारंगी चेरी टोमॅटो'साठी राखीव ठेवला आहे.

वेगवेगळ्या रंगांची वेगळी चव आणि वैशिष्ट्ये

तज्ज्ञांच्या मते, सध्याचे ग्राहक आरोग्याबाबत जागरूक असून, नवनवीन प्रयोग करण्यास उत्सुक आहेत. वेगवेगळ्या रंगांचे टोमॅटो केवळ जेवणात रंग भरत नसून, त्यांची चवही वेगळी आहे. नारंगी टोमॅटो हे लाल टोमॅटोच्या तुलनेत थोडे जास्त रसाळ आणि फळासारखे लागतात. पिवळ्या टोमॅटोमध्‍ये आंबटपणा कमी आणि गोडवा जास्त असतो. तपकिरी टोमॅटोमध्ये 'उमामी' प्रकारची समृद्ध आणि वेगळी चव मिळते. याशिवाय बाजारात हिरवे ‘टायगर' आणि ‘पिंक ओइशी' यासारखे आकर्षक रंगही उपलब्ध आहेत, ते ग्राहकांना आकर्षित करत आहेत.

आर्थिक बदल आणि बाजारपेठ

पारंपरिक गोल लाल टोमॅटोची वार्षिक विक्री अजूनही १९० दशलक्ष पाऊंड असली, तरी ती गतवर्षीच्या तुलनेत ५ दशलक्ष पाऊंडने घसरली आहे. याउलट, प्रीमियम 'चेरी ऑन द वाइन' टोमॅटोची विक्री १६ दशलक्ष पाऊंडने वाढून १८० दशलक्ष पाऊंडवर पोहोचली आहे. केवळ दोन वर्षांत या रंगीबेरंगी टोमॅटोची बाजारपेठ दुप्पट होऊन ५० दशलक्ष पाऊंडवर पोहोचली आहे. सुपरमार्केटस्‌ आता या वेगवेगळ्या रंगांच्या टोमॅटोचे मोठे मिक्स बॉक्स विकत आहेत, ते ग्राहकांना प्रति किलो दराच्या हिशेबाने स्वस्त आणि फायदेशीर पडत आहेत. हा रंगांचा बदल ग्राहकांसाठी निवडीचे स्वातंत्र्य आणि जेवणामध्ये नवा उत्साह घेऊन आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news