Yale University | ३०० वर्षे जुने आहे ‘येल युनिव्हर्सिटी’चे भारताशी नाते

इलिहू येल अनेक वर्षे राहिले होते भारतात
Yale University |
Yale University | ३०० वर्षे जुने आहे ‘येल युनिव्हर्सिटी’चे भारताशी नाते
Published on
Updated on

नवी दिल्ली : जगातील अत्यंत प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक असलेल्या अमेरिकेतील ‘येल युनिव्हर्सिटी’चे भारताशी असलेले नाते आजचे नसून तब्बल ३०० वर्षांहून अधिक जुने आहे. या कथेच्या केंद्रस्थानी ‘इलिहू येल’ हे ब्रिटिश वसाहतवादी अधिकारी आहेत, ज्यांनी आपल्या कारकिर्दीचा एक महत्त्वाचा काळ भारतामध्ये घालवला होता. विशेष म्हणजे, इलिहू येल यांनी येल युनिव्हर्सिटीची स्थापना केलेली नव्हती. तरीही त्यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून एका अमेरिकन कॉलेजला त्यांचे नाव देण्यात आले, ज्याचे रूपांतर पुढे जगातील प्रख्यात विद्यापीठात झाले.

‘येल सेंटर फॉर ब्रिटिश ॲक्ट’नुसार, इलिहू येल हे १६७२ मध्ये मद्रास (आजचे चेन्‍नई) येथे पोहोचले होते. त्यावेळी ते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसाठी काम करत होते. भारतात त्यांची कारकीर्द हळूहळू पुढे सरकली आणि शेवटी ते ‘फोर्ट सेंट जॉर्ज’चे गव्हर्नर बनले. त्यांनी १६८७ ते १६९२ या काळात हे पद भूषवले. त्या काळात फोर्ट सेंट जॉर्ज हे मद्रासमधील ईस्ट इंडिया कंपनीचे प्रमुख केंद्र होते. भारतातील आपल्या दीर्घ कार्यकाळात इलिहू येल यांनी मोठी संपत्ती गोळा केली. मात्र, त्यांच्या संपत्तीची कथा केवळ व्यावसायिक यशापुरती मर्यादित नव्हती. येल युनिव्हर्सिटीशी संबंधित ऐतिहासिक संशोधनानुसार, त्यांच्या संपत्तीचा एक भाग ईस्ट इंडिया कंपनीच्या गुलामांच्या व्यापारातील सहभाग आणि इतर व्यावसायिक उपक्रमांशी जोडलेला होता. त्यामुळे येल यांचा वारसा समजून घेताना त्यांच्या योगदानासोबतच या वसाहतवादी इतिहासाकडेही दुर्लक्ष करता येत नाही.

भारतातून इंग्लंडला परतल्यानंतर इलिहू येल हे अमेरिकेतील कनेक्टीकट येथे स्थापन झालेल्या ‘कॉलेजिएट स्कूल ऑफ कनेक्टीकट’चे महत्त्वाचे समर्थक बनले. या संस्थेची स्थापना १७०१ मध्ये झाली होती आणि १७१६ मध्ये ती कायमस्वरूपी न्यू हेव्हन येथे हलवण्यात आली. यानंतर १७१८ मध्ये इलिहू येल यांनी कॉलेजला एक मोठी भेट पाठवली. यामध्ये ४१७ पुस्तके, राजा जॉर्ज पहिला याचे एक चित्र, शाही प्रतीक आणि वस्तूंचे नऊ गठ्ठे (Bales) समाविष्ट होते. इलिहू येल यांच्या या देणगीत भारताची उपस्थिती विशेष लक्ष वेधून घेते. येलच्या ऐतिहासिक नोंदींनुसार, पाठवलेल्या साहित्यात भारतातून आलेले कापडही समाविष्ट होते.

‘येल ग्लोबलिस्ट’च्या एका अहवालानुसार, या सामानात भारतीय कापडाच्या तीन मोठ्या गाठींचा विशेष उल्लेख आढळतो. म्हणजेच, भारताशी संबंधित वस्तू अप्रत्यक्षपणे त्या संस्थेच्या सुरुवातीच्या आर्थिक उभारणीचा भाग बनल्या, ज्याला पुढे ‘येल कॉलेज’ म्हणून ओळखले गेले. हा या कथेतील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. सामान्य समजाच्या उलट, इलिहू येल यांनी येल युनिव्हर्सिटीची स्थापना केली नव्हती. ‘कॉलेजिएट स्कूल ऑफ कनेक्टिकट’ची स्थापना १७०१ मध्येच झाली होती. वर्ष १७१८ मध्ये इलिहू येल यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून या संस्थेला ‘येल कॉलेज’ असे नाव देण्यात आले. पुढे याच संस्थेचा विकास होऊन ‘येल युनिव्हर्सिटी’ बनली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news