

सॅन फ्रान्सिस्को : टेक जगतातील दिग्गज उद्योगपती एलन मस्क आपल्या धाडसी निर्णयामुळे पुन्हा एकदा जगभरात चर्चेत आले आहेत. मस्क यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करत मोठी घोषणा केली आहे. सुरक्षा पुनरावलोकन पूर्ण होताच, कंपनी कोणत्याही अपवादाशिवाय 'X' चा संपूर्ण कोडबेस ‘ओपन सोर्स’ करणार असल्याचे मस्क यांनी स्पष्ट केले आहे.
सिस्टमच्या पारदर्शकतेची पडताळणी करण्यासाठी थर्ड-पार्टी रिव्ह्यूअर्सना (बाहेरून तपासणी करणारे तज्ज्ञ) आमंत्रित केले जाईल, जेणेकरून सार्वजनिक केलेला कोडच प्रत्यक्षात प्लॅटफॉर्मवर वापरला जात आहे की नाही, याची खात्री करता येईल. मस्क यांच्या मते, या निर्णयाचा मुख्य उद्देश पूर्ण पारदर्शकता आणून युजर्सचा विश्वास जिंकणे हा आहे. कोडबेस ओपन सोर्स होणे म्हणजे जगातील कोणताही डेव्हलपर, संशोधक किंवा सामान्य युजर्स ‘X’ चे अंतर्गत सिस्टीम आणि अल्गोरिदम कसे काम करते, हे सहज पाहू शकतील. बॅकएंडवर तोच कोड कार्यरत आहे ना, जो सार्वजनिक केला गेला आहे, याची स्वतंत्रपणे तपासणी करण्यासाठी तज्ज्ञांना आमंत्रित केले जाईल.
जर ‘X’ ने आपला संपूर्ण कोड आणि सिस्टीम सार्वजनिक केली, तर स्वतंत्र ऑडिट शक्य असणारा हा जगातील पहिला मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ठरेल. 'X' च्या या पावलामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉक आणि रेडिट यांसारख्या इतर बड्या सोशल मीडिया कंपन्यांवरही पारदर्शकता दाखवण्यासाठी मोठा दबाव वाढू शकतो. जर 'X' चा हा प्रयोग यशस्वी ठरला, तर जगभरातील रेग्युलेटर्स (नियामक मंडळ) आणि युजर्स इतर प्लॅटफॉर्म्सना त्यांचे अल्गोरिदम कसे काम करतात, असा जाब विचारू शकतात. इतर कंपन्यांनाही त्यांच्या प्लॅटफॉर्मचे काही भाग ओपन सोर्स करण्यासाठी किंवा तांत्रिक कागदपत्रे सार्वजनिक करण्यासाठी भाग पाडले जाऊ शकते. कोडबेस सार्वजनिक झाल्यानंतर संशोधकांना ‘AI रिकमेंडेशन अल्गोरिदम’ आणि प्लॅटफॉर्मच्या तांत्रिक रचनेचा सखोल अभ्यास करता येईल. युजर्सना एखादा कंटेंट का दाखवला जातो आणि अल्गोरिदम नेमके कसे काम करतात, हे समजणे सोपे होईल.