

मुंबई : मानवी इतिहासाच्या बहुतांश काळात, माणसाच्या शरीराला छेद दिल्याशिवाय आतले पाहणे अशक्य होते. मात्र, 1895 मध्ये एका जर्मन भौतिकशास्त्रज्ञाने शोधलेल्या एका गूढ प्रकाशाने जगाचा चेहरामोहरा बदलून टाकला. 8 नोव्हेंबर 1895 हा ऐतिहासिक दिवस ठरला. जर्मनीतील वुर्झबर्ग विद्यापीठात विल्हेल्म कॉनराड रॉन्टजेन हे कॅथोड रे वर प्रयोग करत होते. खोलीत पूर्ण अंधार असताना त्यांना शेजारी ठेवलेल्या एका रासायनिक लेप लावलेल्या पडद्यावर अचानक एक चमक (ग्लो) दिसली. नळीमधून बाहेर पडणारे काही अद़ृश्य किरण या चमकेला कारणीभूत होते. त्यानंतर रॉन्टजेन यांनी पुढील सात आठवडे स्वतःला प्रयोगशाळेत कोंडून घेतले. हे किरण नेमके काय आहेत हे माहीत नसल्यामुळे, गणितातील अज्ञात चलाप्रमाणे (अनोन व्हेरिएबल) त्यांनी याला **क्ष-किरण (एक्स रे) असे नाव दिले.
प्रयोगादरम्यान रॉन्टजेन यांच्या लक्षात आले की हे किरण कागद, लाकूड आणि रबर यांच्या आरपार जातात; पण शिशासारख्या जड धातूमध्ये शोषले जातात. जेव्हा त्यांनी आपला हात या किरणांच्या मार्गात धरला, तेव्हा त्यांना पडद्यावर त्यांच्या हाडांची सावली दिसली. त्यांनी आपली पत्नी बर्था रॉन्टजेन यांच्या हाताचा फोटो काढला, ज्यामध्ये तिची हाडे आणि लग्नाची अंगठी स्पष्ट दिसत होती. हा जगातील पहिला मानवी क्ष-किरण फोटो ठरला. त्यानंतर काही महिन्यांतच डॉक्टरांनी गोळ्या शोधण्यासाठी आणि मोडलेली हाडे पाहण्यासाठी याचा वापर सुरू केला. यातूनच रेडिओलॉजी या शाखेचा जन्म झाला. या महान शोधासाठी 1901 मध्ये रॉन्टजेन यांना भौतिकशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक मिळाले.
क्ष-किरणांची इतकी क्रेझ निर्माण झाली की, 1930 च्या दशकात सुपरमॅनला एक्स-रे व्हिजन देण्यात आले. काही कपड्यांच्या कंपन्यांनी एक्स-रे प्रूफ अंतर्वस्त्रे विकण्यासही सुरुवात केली होती.
सुरुवातीला लोकांना यातील किरणोत्सर्गाच्या (रेडिएशन) धोक्याची कल्पना नव्हती. अनेकांना त्वचा जळणे, डोळ्यांना इजा होणे आणि कर्करोगासारख्या समस्यांना सामोरे जावे लागले. थॉमस एडिसनच्या एका सहाय्यकाचा कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर एडिसनने क्ष-किरणांवरील काम थांबवले होते. आज क्ष-किरण हे केवळ रुग्णालयातच नाही, तर विमानतळावरील सुरक्षा तपासणी, दातदुखीचे निदान आणि अगदी अंतराळ संशोधनातही वापरले जातात. विशेष म्हणजे रॉन्टजेन इतके साधे होते की, त्यांनी आपल्या या शोधाचे पेटंट घेतले नाही. त्यांना वाटले की, हा शोध संपूर्ण मानवजातीच्या फायद्यासाठी मोफत उपलब्ध असावा.