

बर्लिन : जर्मनीमध्ये संशोधकांना पहिल्यांदाच नैसर्गिक कृमी मनोरे आढळले आहेत. यापूर्वी अशा प्रकारचे वर्तन फक्त प्रयोगशाळेतच दिसून आले होते. ‘करंट बायोलॉजी’ या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालामध्ये या शोधाची माहिती देण्यात आली आहे.
कोंस्टान्झ विद्यापीठातील संशोधकांनी स्थानिक फळबागांमध्ये पडलेल्या सफरचंद आणि नाशपातीवर या कृमी मनोर्यांचे निरीक्षण केले. ‘मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट ऑफ अॅनिमल बिहेवियर’ आणि कोंस्टान्झ विद्यापीठाच्या टीमने हे निष्कर्ष काढले की, हे वर्तन नैसर्गिक आहे आणि कृमी सामूहिकरीत्या एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाण्यासाठी हे करतात. संशोधकांनी सांगितले की, अनेक नेमाटोड प्रजाती फळांमध्ये रेंगाळताना दिसल्या, परंतु ‘dauer’ नावाच्या कठीण लार्वा अवस्थेतील काही ठरावीक प्रजातीच मनोरे बनवण्यात सहभागी होत्या. कृमी मनोर्याच्या बांधकामातील प्रजातींची विशिष्ट पातळी दर्शवते की, या द़ृच्छिक प्राण्यांच्या समूहांपेक्षा या वर्तनाला अधिक प्रेरणा मिळत आहे.
या संशोधनामुळे इतर प्राण्यांच्या वर्तनाचे रहस्य उलगडण्यास मदत होऊ शकते. यापूर्वी स्लाईम मोल्डस्, फायर मुंग्या आणि स्पायडर माईटस्मध्ये मनोर्यांसारखे वर्तन दिसून आले आहे. परंतु, ते निसर्गात तुलनेने दुर्मीळ आहे. इतर प्रकारच्या कृमींना असे ‘सुपरऑर्गेनिझम’ बनवता येतात का, हे पाहण्यासाठी संशोधकांनी Caenorhabditis elegans या गोलकृमीला (roundworm) अशाच रचनांमध्ये एकत्र येण्यासाठी प्रशिक्षित केले. C. elegans हा एक मॉडेल जीव आहे, ज्याचा उपयोग वर्तन आणि जीवशास्त्र या दोन्हींसाठी मोठ्या प्रमाणावर अभ्यासला जातो. पेरेझ यांनी टूथब्रशचे ब्रिस्टल (तार) अन्नाशिवाय असलेल्या अगर प्लेटमध्ये लावले आणि त्यात कृमी सोडले.
दोन तासांच्या आत, C. elegans ने ब्रिस्टलचा कणा म्हणून उपयोग करून मनोरा तयार केला. काही लहान कृमी समूहांनी शोध घेण्यासाठी बाहू बाहेर काढले, तर काहींनी मोकळ्या जागांमध्ये पूल बांधले. जेव्हा संशोधकांनी काचेच्या साहाय्याने मनोर्याच्या वरच्या भागाला स्पर्श केला, तेव्हा कृमी त्या उत्तेजनाच्या दिशेने वळवळल्या. पेरेझ म्हणतात, ‘हे मनोरे सक्रियपणे संवेदना घेत आहेत आणि वाढत आहेत. जेव्हा आम्ही त्यांना स्पर्श केला, तेव्हा त्यांनी त्वरित प्रतिसाद दिला आणि उत्तेजनाच्या दिशेने वाढून त्याला जोडले.’ अशाच प्रकारे ते एखाद्या किड्याला, भुंग्याला चिकटून अन्यत्र जातात.