

बीजिंग : सॅटेलाईटद्वारे टिपलेल्या एका आश्चर्यकारक छायाचित्राने चीनमधील एका विस्तीर्ण विवराचे रहस्य जगासमोर आणले आहे. संशोधकांच्या मते, हे विवर पृथ्वीवरील अशा प्रकारच्या रचनांपैकी सर्वात ‘तरुण’ असून, गेल्या 1 लाख वर्षांतील हा सर्वात मोठा ‘इम्पॅक्ट क्रेटर’ ठरण्याची शक्यता आहे.
चीनच्या हेलॉन्गजियांग प्रांतातील लेसर झिंगान पर्वत रांगेत हे विवर स्थित आहे. याला ‘येईलान विवर’ असे नाव देण्यात आले असून, हे चीनमध्ये सापडलेले केवळ दुसरेच ‘इम्पॅक्ट क्रेटर’ आहे. हे विवर घोड्याच्या नालेसारखे अर्धवट वर्तुळाकार असून, याचा विस्तार 1.15 मैल (1.85 कि.मी.) इतका आहे. विवराच्या भिंती जमिनीपासून सुमारे 500 फूट (150 मीटर) उंच आहेत. 2021 मध्ये चिनी संशोधकांनी या विवराचा शोध लावला. त्यापूर्वी दाट जंगलामुळे ते जगाच्या नजरेतून सुटले होते. स्थानिक लोक याला ‘क्वानशान’ म्हणजेच ‘गोलाकार पर्वतरांग’ म्हणत असत.
मात्र, जेव्हा शास्त्रज्ञांनी विवराच्या तळापासून 1,440 फूट खाली खोदकाम केले, तेव्हा त्यांना तिथे ‘शॉक्ड क्वार्ट्ज’, वितळलेले ग्रॅनाईट आणि काचेचे तुकडे सापडले. अवकाशातून एखादा मोठा खडक वेगाने आदळल्यानंतरच अशा प्रकारची चिन्हे निर्माण होतात. या शोधाने अमेरिकेतील अॅरिझोना येथील प्रसिद्ध ’बॅरिंजर क्रेटर’चा विक्रम धोक्यात आणला आहे. कार्बन डेटिंगनुसार, हे विवर 46,000 ते 53,000 वर्षांपूर्वी तयार झाले असावे. पृथ्वीवर सापडलेल्या अंदाजे 200 मोठ्या विवरांमध्ये हे सर्वात तरुण असू शकते. 1 लाख वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या विवरांमध्ये हे जगातील सर्वात मोठे विवर ठरले आहे. यापूर्वी अॅरिझोनाचे विवर (0.75 मैल रुंद) हे सर्वात मोठे मानले जात होते. परंतु, येईलान विवराचा विस्तार त्यापेक्षा जास्त आहे.