

वेलिंग्टन ः जगात अनेक अनोखी विमानतळेही पाहायला मिळतात. कुठे अगदी लोकांच्या डोक्यावरून विमान जाते तर कुठे समुद्रकिनारी धोकादायक ठिकाणी विमानतळ आहे. असेच एक अनोखे विमानतळ आहे, जिथे विमान आणि ट्रेन एकाच ठिकाणाहून जातात. जगातील हे विमानतळ असं आहे, जिथे रनवेवर आधी ट्रेन धावते आणि नंतर विमान टेकऑफ घेते. कल्पना करा, एका बाजूला एक विमान उड्डाणासाठी तयार आहे आणि त्याच धावपट्टीवरून एक ट्रेन जात आहे. अजून एक गोष्ट जाणून तुम्हाला नवलं वाटेल की, पायलटला उड्डाण करण्यापूर्वी ट्रेन जाण्याची वाट पहावी लागते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कुठे आहे हे विचित्र विमानतळ.
न्यूझीलंडच्या नॉर्थ आयलंडवरील गिस्बोर्न शहरात बांधलेले हे विमानतळ जगातील सर्वात अनोख्या विमानतळांमधील एक आहे. या विमानतळाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या मुख्य धावपट्टीवरून एक रेल्वे ट्रॅक जातो. हा ट्रॅक ‘पामरस्टन नॉर्थ-गिसबोर्न’ रेल्वे मार्गाचा एक भाग आहे जो धावपट्टीला दोन भागांत विभागतो. यामुळेच उड्डाणे आणि गाड्यांचे वेळापत्रक अतिशय काळजीपूर्वक व्यवस्थापित करावे लागते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गिस्बोर्न विमानतळावर सकाळी 6.30 ते रात्री 8.30 पर्यंत विमाने आणि ट्रेन दोन्ही धावपट्टी ओलांडतात. अशा परिस्थितीत, जेव्हा ट्रेनला धावपट्टी ओलांडायची असते, तेव्हा विमानाला टेकऑफ करण्यापूर्वी थांबावे लागते. त्याच वेळी, जर विमान धावपट्टीवर असेल तर ट्रेनला थांबण्याचा सिग्नल दिला जातो. कोणाला आधी रस्ता द्यायचा, यावर विमानतळ प्रशासनाचे पूर्ण नियंत्रण असते. एकेकाळी ऑस्ट्रेलियातील टास्मानिया येथील वायनयार्ड विमानतळावर असा ट्रॅक होता; पण आता तिथे रेल्वे सेवा बंद आहे. यामुळे गिस्बोर्न विमानतळ सध्या जगातील एकमेव विमानतळ आहे, जिथे धावपट्टीवरून ट्रेन जाते. येथे दर आठवड्याला सुमारे 60 देशांतर्गत उड्डाणे होतात आणि दरवर्षी या विमानतळावरून 1.5 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. या विमानतळाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही आश्चर्यकारक व्यवस्था पाहून लोक थक्क होतात. विमान आणि ट्रेनमधील समन्वयाचा हा खेळ लोकांसाठी पाहण्यासारखा आहे. तसेच गिस्बोर्नचे सुंदर नैसर्गिक स्थान ते आणखी खास बनवते.