

न्यूयॉर्क : गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या काठी उभारण्यात आलेला जगातील सर्वात उंच असा सरदार पटेल यांचा पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ अवकाशातूनही स्पष्ट दिसतो. अमेरिकेच्या कमर्शियल सॅटेलाइट नेटवर्क- ‘प्लॅनेट लॅब्स’ने या उंच पुतळ्याचा अवकाशातून टिपलेला एक फोटो 2018 मध्ये टि्वट केला होता. हा पुतळा 597 फूट उंच आहे. अमेरिकेतील 305 फुटांच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा याची उंची दुप्पट आहे. यासोबतच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा अशा काही मानवनिर्मिती कलाकृतींपैकी आहे, ज्या अवकाशातूनही दिसतात. दुबईच्या तटावर बनलेले पाम आयलँड, चीनची भिंत आणि इजिप्तचे ग्रेट पिरॅमिड ऑफ गिझा याही अशाच मानवनिर्मिती कलाकृती आहेत, ज्या अवकाशातून दिसून येतात.
स्टॅच्यू ऑफ युनिटीचा फोटो जारी करणार्या अमेरिकी कंपनीचे नाव स्कायलॅब आहे. 2017 मध्ये इस्रोने एकत्र 104 सॅटेलाइट लाँच करण्याचा विक्रम रचला होता. तेव्हा यात 88 डव्ह सॅटेलाइट स्कायलॅब कंपनीचेच होते. याच कंपनीच्या सॅटेलाईटने या पुतळ्याचे छायाचित्र टिपले होते. सरदार पटेल यांचा हा पुतळा गुजरातच्या केवडियामध्ये नर्मदा नदीवर असलेल्या सरदार सरोवर धरणावर उभारण्यात आला आहे. हा पुतळा 7 किलोमीटर अंतरावरूनही दिसतो. याच्या बांधकामासाठी 5 वर्षांचा काळ लागला. हा जगात सर्वात कमी काळात उभारण्यात आलेला अतिशय भव्य पुतळा आहे. याच्या निर्मितीसाठी 2990 कोटी रुपयांची रक्कम लागली. जगातील सर्वात उंच पुतळा असा या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळ्याचा लौकिक आहे.